दीपक मोहिते,
आपण लोकप्रतिनिधीना का व कशासाठी निवडून पाठवतो ? वाचा आणि विचार करा ….
१ ) नगरसेवक :- परिसर स्वच्छता,गटारव्यवस्था,
पाणीपुरवठा,
चांगले रस्ते व परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी,
परंतु ही कामे करण्याऐवजी आपले नगरसेवक अनधिकृत बांधकामे,विकासकाना नळजोडण्या मिळवून देणे,त्यांच्या अनधिकृत बांधकामाना संरक्षण देणे,ठेकेदाराकडून टक्केवारी मिळवणे,इ.कामांवर लक्ष देत असतात.
२ ) आमदार :- मतदारसंघातील विकासाच्या जटील समस्या सोडवणे,उद्योगधंदे वाढ,शिक्षण,कृषी,
रोजगार,कायदा व सुव्यवस्था स्थिती बिघडु नये,जातीय सलोखा अबाधित राखणे,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अडचणी व समस्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करणे व परिसर विकासाला चालना मिळावी,यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक निधी मिळवणे,प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवणे,
परंतु ही सार्वजनिक कामे करण्याऐवजी साखर कारखाने काढणे,दुग्ध प्रकल्प उभारणे,शिक्षणसंस्था निर्माण करणे,आपल्या आमदार फंडातून करणाऱ्या कामात वसुली करणे,कंत्राटदाराना सरकारकडून मोठी कंत्राटे मिळवून देणे इ.कामावर ९० टक्के आमदाराचा भर असतो.
३ ) खासदार :- स्थानिक विकासकामासाठी आर्थिक निधी खर्च करणे,रेल्वे,राष्ट्रीय महामार्ग,वन,परिसरात केंद्रीय उद्योगधंदे आणणे,त्यामधुन परिसरातील बेरोजगाराना रोजगार उपलब्ध करणे,मतदारसंघातील कृषी क्षेत्राला चालना मिळावी,यासाठी असलेल्या कृषीविषयक केंद्रीय योजनाच्या अमलबजावणीवर ( पीक विमा योजना,नैसर्गिक आपत्ती निवारण कामावर लक्ष ठेवणे ) मागासवर्गाच्या विकासासाठी झटणे व देशाच्या प्रगतीसाठी आखण्यात आलेल्या धोरणामध्ये सक्रीय सहभागी होणे.
परंतु सध्याचे सर्व खासदार केवळ उदघाटने,उद्योगपतीच्या महाकाय प्रकल्पासाठी सर्वस्व पणाला लावणे,मंत्र्यांना निवेदने देण्याचे सपाटा लावणे व त्याचे व्हिडियो सोशल मिडियावर वायरल करणे,खासदार निधीतून विकासकामे करण्याऐवजी कंत्राटदारांचे हित जपण्यात समाधान मानतात.तसेच परिसरातील विविध प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या भूमिपुत्रांऐवजी या मंडळीना उद्योगपती जवळचे वाटतात कारण यामागे मोठे अर्थकारण दडलेले असते…
कालांतराने लोक अशा लोकप्रतिनिधीना कंटाळतात व त्यांच्या हाती नारळ देतात. आपण ” लोकसेवक,” आहोत, याचा विसर पडत चालल्यामुळे या अशा आपमतलबी लोकप्रतिनिधीना लोक घरी बसवतात.

