दीपक मोहिते,
७९ वा स्वातंत्र्यदिन ; ” ख़ुशी कम,जादा गम,”
येत्या १५ ऑगस्ट रोजी आपला देश स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहे.गेल्या ७९ वर्षाच्या काळात आपल्या देशाने बरीच प्रगती केली.आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपण भरीव कामगिरी करू शकलो.आज जगातील विकसनशील देशाच्या रांगेत आपला क्रमांक सहावा आहे.संरक्षण क्षेत्रात आपण सक्षम तसेच अन्न-धान्य उत्पादनातही आपण स्वयंपूर्ण झालो आहोत.१९६४ ते १९७२ हा काळ आपल्यासाठी कसोटीचा काळ होता.एकामागोमाग तीन युध्ये,दुष्काळ,अन्न-धान्यटंचाई व बेरोजगारी इ.समस्यानी देश आर्थिक खाईत सापडला होता.पण त्याकाळी दूरदृष्टी असलेल्या शासनकर्त्यांनी या सर्व संकटाचे धनुष्य यशस्वीपणे पेलले व देश त्यातून बाहेर पडला.देशाची धुरा जनतेने स्व. जवाहरलाल नेहरू त्यानंतर स्व. लालबहादूर शास्त्री व स्व.पंतप्रधान इंदिरा गांधी या दिग्गज नेत्यांकडे सोपवली व त्यांनी या सर्व संकटाचा समर्थपणे मुकाबला केला.
त्यानंतर ९० च्या दशकात जगभरात आलेल्या मंदीच्या लाटेत अनेक देशाची अर्थव्यवस्था कोसळली.त्यामध्ये आपल्या देशाचाही समावेश होता.परंतु पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंह यांनी आर्थिक सुधारणा व खुले व्यापार / औद्योगिक धोरण स्विकारले व देशाने विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली.परिस्थितीत चांगलाच बदल घडून आला.तत्पूर्वी १९७५ ते १९७७ या दोन वर्षाच्या काळात देशात अनेक उलथापालथी घडल्या.गुजरात राज्यात विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाने कॉंग्रेस सरकारला हादरे बसण्यास सुरुवात झाली होती.त्यातून आणीबाणीचा जन्म झाला,भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळाकुट्ट कालखंड़ तुम्ही-आम्ही सगळ्यांनी अनुभवला.लोकशाहीची चौकट तोडायचे काम संजय गांधी,विद्याचरण शुक्ल,आर.के धवन,नारायण दत्त तिवारी,देवकांत बारुआ व अन्य काही कॉंग्रेसजनानी केला.लाखो लोकांची धरपकड़ झाली,या चौकडीने देशाचा तुरुंगच बनवला होता.देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने सुरु झाली,अशी भिती सर्वत्र व्यक्त होवू लागली.दरम्यान सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या.मतदारराजा सजग झाला,त्याने कॉंग्रेसला धूळ चारली व जनता दलाचे सरकार सत्तेत आले.परंतु या सरकारने जनतेची घोर निराशा केली,अल्पावधित मोरारजी देसाई याना पायउतार व्हावे लागले.या सर्व घडामोडीनंतर देशाची आर्थिक घडी पार विस्कटली गेली होती.राजकीय अस्थिरतेमुळे सर्वच क्षेत्रात त्याचे परिणाम जाणवले.त्यानंतरच्या काळात मंडल आयोगाच्या शिफारशींची अमलबजावणी,बाबरी मशीद प्रकरण इ.घटनानी देशात अराजक स्थिती निर्माण झाली.नरसिंह राव,अटलबिहारी वाजपेयी व त्यानंतर डॉ.मनमोहनसिंग यानी देशाची धुरा सांभाळली.सन १९९९ ते २०१४ दरम्यान माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यानी आपल्या कार्यकालात केलेल्या आर्थिक सुधारणामुळे आपली आर्थिक स्थिति मजबूत होवू शकली.जागतिक स्पर्धेत आपण सध्या सहाव्या क्रमांकावर आहोत.जागतिक बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण झाला.परंतु त्यांच्या काळात कॉंग्रेसजन व घटक पक्षांच्या नेत्यांनी केलेले आर्थिक घोटाळे त्याना सत्तेतून पायउतार होण्यास कारणीभूत ठरले.जी 2,कोल असे एक ना अनेक घोटाळ्यांनी त्यांचा उत्तरार्ध काळाकुट्ट ठरला.देश आज आर्थिकदृष्टया सुस्थितीत असला तरी कृषी, रोजगार,ग्रामीण आरोग्य,वाढती महागाई व शिक्षण इ. क्षेत्रात अद्याप आपल्याला मोठा पल्ला गाठायचा आहे.दुर्दैवाने या महत्वाच्या कामाकडे आपले दुर्लक्ष होत आहे.अनेक वर्षे सुप्तावस्थेत असलेली धार्मिक तेढ वेगाने डोके वर काढू लागली आहे.सोशल मिडियाचा सर्वाधिक वापर तेढ वाढवण्यासाठी होत आहे.सहिष्णुता व असहिष्णुता यावर सर्वत्र वादंग सुरु झाले आहेत,शत्रुराष्ट्रे देशात अराजक स्थिती निर्माण व्हावी,यासाठी अतिरेकी कारवायाना उत्तेजन देत आहेत.अशा परिस्थितीत सत्ताधारी व विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवे.ज्या देशात धर्मवादाने राजकारणात प्रवेश केला,त्या सर्व राष्ट्राची वाताहात झाली,हे आपण पाकिस्तान,सीरिया,इराक,
अफगाणिस्तान या देशातील अराजक स्थिती आपण पाहू शकतो.येणाऱ्या काळात आपला देश जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असेल,असा आशावाद व्यक्त होत असला तरी देशातील सध्याचे वातावरण हे अराजकाला आमंत्रण देणारे आहे.मूठभर धनाढ्य उद्योगपतीच्या हातात उद्योग धंदे व अर्थव्यवस्था जाणे,हे अत्यंत धोकादायक असुन सध्या देश वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला आहे.लोकांचे दरडोई उत्पन्न सतत घसरत चालले आहे.वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या नागरी सुविधा,रोजगार,उद्योगधंदे वाढ,इ.प्रश्न आ वासून उभे ठाकले आहेत.सध्याचे नेतृत्व हे देशाची अर्थव्यवस्था समर्थपणे पेलू शकेल,असे नसल्यामुळे अमेरिकेसारखे देश भरमसाठ टॅरिफ लावून आपल्या निर्यात धोरणाचा बट्याबोळ करू पाहत आहे. आपला व्यापार,अर्थकारण व संरक्षण धोरण,यामध्ये अमेरिकेचा वाढता हस्तक्षेप देशाची अखंडता व एकतेला धोका निर्माण करणारा आहे. अशा सर्व परिस्थितीत आपण ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. ” खुशी कम, जादा गम,” असे या स्वातंत्र्यदिनाचे वर्णन केल्यास ते वावगं ठरू नये..

