दिपक मोहिते,
निवडणूक आयोगाचा दणका,
केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ; ३३४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द,
केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसापूर्वी ३३४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे.निवडणूक आयोगाने फक्त सहा राजकीय पक्षांचाच राष्ट्रीय पक्षांचा दर्जा कायम ठेवला आहे.
राष्ट्रीय सहा पक्षांमध्ये भाजप आणि काँग्रेस,आम आदमी पक्ष,माकप,एनपीपी आणि स्व.कांशीराम यांनी स्थापन केलेल्या आणि मायावती यांचे नेतृत्त्व असलेल्या बहुजन समाज पार्टी’चा त्यामध्ये समावेश आहे.याव्यतिरिक्त इतर अनेक राजकीय पक्षांचा प्रादेशिक दर्जा कायम ठेवला आहे.समाजवादी पक्ष,तृणमुल काँग्रेस,दोन्ही शिवसेना,दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस,द्रमुक अण्णाद्रमुक,तेलंगणा राष्ट्रीय समिती,हरियाणा विकास पार्टी,आसाम गण परिषद, वायएसआर काँग्रेस,बिजू जनता दल,राजद,ज.द.( धर्मनिरपेक्ष ) अनेक राज्यातील प्रादेशिक पक्षांचा समावेश आहे.निवडणूक आयोगाचा सदर निर्णय बहुजन समाज पक्षासाठी दिलासा देणारा आहे.कारण बसपाचा उत्तर प्रदेश वगळता अन्य राज्यात नाममात्र अस्तित्व असताना त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देणे,हे आश्चर्यजनक आहे.उत्तर प्रदेशातही बसपाची गेल्या काही वर्षात प्रचंड घसरण सुरु आहे.त्यामुळे त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणते निकष लावले,हे कळायला मार्ग नाही.तसेच आयोगाने अनेक पक्षाची मान्यता रद्द केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ९ पक्षाचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत तब्बल ३३४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे.यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल ९ पक्षांचा समावेश आहे.निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी पक्षांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.त्यामध्ये काही पक्ष निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे पक्षांचे अस्तित्व संपवत त्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील मान्यता रद्द झालेल्या राजकीय पक्षांमध्ये आवामी विकास लीग,इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, नवभारत डेमोक्रेटिक पार्टी, बहुजन रयत पार्टी,भारतीय संग्राम परिषद,लोक पार्टी ऑफ इंडिया,युवा शक्ति संघटना,नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी,पीपल्स गार्डियन या पक्षांचा समावेश आहे.निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईमध्ये मान्यता रद्द झालेल्या पक्षांमध्ये सर्वाधिक पक्ष हे उत्तर प्रदेशमधील आहेत.उत्तर प्रदेशमधील तब्बल ११४ पक्षांचा समावेश आहे.उत्तर प्रदेश खालोखाल दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर असून दिल्लीतील २७ पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईनंतर देशभरात केवळ सहा राष्ट्रीय तर ६७ प्रादेशिक पक्ष उरले आहेत.राष्ट्रीय पक्षांमध्ये काँग्रेस,भाजप, बहुजन समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी ),नॅशनल पीपल्स पार्टी आणि आम आदमी पार्टी ( आप ) यांचा समावेश होत आहे.

