दीपक मोहिते,
राजकारणातील सभ्य व आदर्श व्यक्तिमत्व,
आ.गणपतराव देशमुख ; तेथे कर माझे जुळती
आज देशभरातील विधीमंडळांच्या इतिहासातील, एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याचा अबाधित विक्रम ज्यांच्या नावावर आहे,ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आ. गणपतराव देशमुख यांचा जन्मदिन आहे.
१० ऑगस्ट १९२७ रोजी मोहोळ तालुक्यातल्या पेनूर या गावी,एका गरीब शेतकऱ्याच्या घरी जन्म झाला.
जवळचे लोक गणपतराव देशमुख यांना आबा म्हणत असत.मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर असलेलं पेन्नूर हे त्यांचं गाव.मॅट्रिकचे शिक्षण पुण्यात घेतल्यानंतर गणपतराव देशमुख यांनी पुण्यात पुढील शिक्षण पूर्ण केलं.त्यांचे शिक्षण एल.एल.बी.पर्यत झाले. गणपतरावांची खरी जडणघडण झाली ती पुण्यातच.शिकत असतानाच ते शेतकरी कामगार पक्षाच्या विद्यार्थी सभेत काम करू लागले. स्वातंत्र्य नुकतच मिळालं होतं.पण सुराज्य आलं नव्हतं.शेतकरी,कामगारांचं राज्य यावं,यासाठी हे तरुण कामाला लागले.भाई शंकरराव मोरे,कॉम्रेड मालिनीताई तुळपुळे आणि कॉम्रेड भागवत या तरुणांचे मार्गदर्शक होते.या तरुणांच्या फळीत गणपतराव होते.शंकरराव मोरे,केशवराव जेधे, र.के.खाडीलकर,भाऊसाहेब शिरोळे हे शेकापचे ज्येष्ठ नेते त्यावेळी गाजत होते. गणपतराव त्यांच्या विचाराने भारावून गेले होते.संघटनेत पडेल ते काम करू लागले. शेकापने चालवलेले `जनसत्ता’ साप्ताहिक विकू लागले. शंकरराव मोरे यांचा सहवास गणपतरावांना तरुणपणीच लाभला.त्यातून त्यांचं अभ्यासू व्यक्तिमत्त्व घडत गेलं.१९४७ मध्ये साने गुरुजींनी दलितांना मंदिर प्रवेश मिळावा,म्हणून पंढरपूरला प्राणांतिक उपोषण सुरू केलं.तेव्हा गणपतराव विद्यार्थी होते.या उपोषणाने महाराष्ट्राला सामाजिक समतेचा मंत्र दिला.त्याचा मोठा परिणाम गणपतरावांच्या समतावादी व्यक्तिमत्वावर झाला.१९५६ मध्ये एल.एल.बी.झाल्यानंतर सांगोले तालुक्यातील गौडवाडी येथील नातेवाईक यशवंतराव देशमुख यांच्याकडे गेले होते.यावेळी यशवंतराव आणि इतर गावकऱ्यांनी घरचाच वकील म्हणून प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना मदत करण्याचा आग्रह धरला. जवळच्या बुद्धेहाळ मध्यम पाटबंधारे प्रकल्पात शेतकऱ्यांची सुमारे १६०० एकर जमीन आणि २५० घरं पाण्याखाली गेली होती.त्यांनी भरपाई मात्र मिळाली नव्हती. हा प्रश्न हाती घेऊन गणपतरावांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.या यशानं गणपतरावांमधल्या चळवळय़ा,संघटक युवक नेत्याला आत्मविश्वास दिला. यामुळे पुढे गौडवाडी – सोमेवाडी परिसर गणपतरावांचा बालेकिल्ला झाला.शेकाप पक्षाला या भागात मोठा पाठिंबा मिळाला.१९५८ ते १९६५ पर्यंत गणपतरावांनी सांगोला कोर्टात वकिलीचा व्यवसाय केला.१९६२ साल गणपतरावांच्या आयुष्यात वेगळं ठरलं.गणपतराव देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२ च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५ चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली.२०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते,मात्र १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले तेव्हा आणि १९९९ मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा,असा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.पुलोद सरकारमध्ये मंत्री असतांना १९८० साली विधानसभा बरखास्त झाल्याचे समजताच चोवीस तासांच्या आत सरकारी बंगला सोडून एस्.टी.ने गाव गाठण्याचा आगळावेगळा ” विक्रम,” पण गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. मंत्री असतांना सुध्दा शासकीय विश्रामगृहाचे बील स्वतःच्या पैशातून भरण्याचा शिरस्ता आबांनी कायम पाळला.२०१४ साली विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम आ.गणपतराव देशमुख यांनी मोडला होता.सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवला होता.२००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते.कायमस्वरूपी दुष्काळाच्या सावटाखाली असलेला सांगोल्याचा आज जो काही कायापालट झाला, त्याच्यामागे गणपतरावांचे अथक प्रयत्न,चिकाटीने काम करण्याची जिद्द आहे.त्यांच्या मतदारसंघात धनगर आणि मराठा या दोन समाजाचे प्राबल्य आहे.पण त्यांनी सर्व समाज सोबत घेऊन काम केले.धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी कधीही आक्रस्ताळेपणाची भूमिका घेतली नाही. सभागृहात व सभागृहाबाहेर प्रश्नांची मुद्देसूद मांडणी व वैचारिक पायांच्या आधारावर त्यांनी ध्येयनिष्ठ राजकारण कायम केले.अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल ५५ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे.आ.गणपतराव देशमुख २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसले नाहीत.प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव वयाच्या ९४ व्या वर्षी गणपतरावांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी लोक उमेदवारी अर्ज भरेपर्यंत लोक त्यांच्याकडे निवडणूक लढवावी,असा हट्ट धरून बसले होते.इतकं प्रेम जनतेनं त्यांच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून केलं. आमदारकीसाठी पक्ष सोडणाऱ्या आजच्या राजकीय काळात गणपतराव देशमुखांनी एका पक्षात राहुन निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या.अगदी मोदी लाटेतही आबासाहेबांना लोकांनी आमदार केलं.पण आमदारकी त्यांनी कधी डोक्यात जाऊ दिली नाही. गणपतराव देशमुख यांचे ३० जुलै २०२१ रोजी निधन झाले.
अशा या थोर महामानवाला शतशः नमन…

