दीपक मोहिते,
आदिवासी समाजाने ” शिका व संघर्ष,” करा,अशी निती स्विकारायला हवी…
काल जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अनेक आदिवासी संघटनानी आपली समाजव्यवस्था,संस्कृती व पारंपारीक कलेचे दर्शन विविध उपक्रमातुन घडवले.स्वातंत्र्याच्या ७९
वर्षानंतरही हा समाज अद्याप ” वंचित घटक,” म्हणून जगभरात प्रचलित आहे.यामागची नेमकी कारणे काय आहेत ? याचा शोध ना सरकारने घेतला ना या समाजाच्या लोकप्रतिनिधीनी घेतला.निरक्षरतेचे वाढते प्रमाण हे,राज्यकर्त्यांच्या पथ्यावर पडले.”आदिवासी विकास,” या गोंडस नावाखाली राजकीय नेते व शासकीय अधिकाऱ्यांनी अक्षरश: लूट केली.आश्रमशाळा व आदिवासी विकास महामंडळे चराऊ कुरणे बनली.आदिवासी हा केवळ नावापुरताच ” जंगलचा राजा,” राहिला.त्यास आपली जगभरात नावाजलेली,परंतु आतून पोखरलेली ” लोकशाही व्यवस्था,” च कारणीभुत आहे.आदिवासींच्या जमिनी लुटल्या,त्याना बेघर करण्यात आले,त्याना स्व:स्त दरात मिळणारे अन्नधान्य काळाबाजारात विकण्यात येते,कुपोषण निर्मूलनासाठी आलेला आर्थिक निधी मध्येच कुठेतरी हड़प होतो,तरीही आपण मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा करत असतो.तो करत असताना आपले ” हक्क व अधिकार,” आपण गमावता कामा नये,परंतु दुर्दैवाने वर्षानुवर्षे हेच चालत आले आहे.समाजाचे भले करण्याच्या नावाखाली त्याना देशोधडीला लावण्याचे काम गेल्या ७९ वर्षात पद्धतशीरपणे करण्यात आले.वास्तविक या समाजातील होतकरु तरुणानी आपल्या समाजाच्या लोकप्रतिनिधीना जाब विचारायला हवा होता.परंतु दुर्दैवाने या समाजातील तरुणवर्ग आजही उदासीनच आहे.आपली संस्कृती जपताना समाजाची प्रगति व उत्थान,या दोन महत्वाच्या विषयावर तरुणानी लक्ष केंद्रित करण्याची गरज होती व आजही आहे.
आज आदिवासी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे,धनदांडग्याची वक्रदृष्टी त्यांच्या जमिनीवर पडली आहे,पण मायबाप सरकारही या कामात मागे नाही.वर्षातून केवळ दिन साजरे करून समाजाचे भले होणार नाही तर ” शिका व संघर्ष,” करा ही निती जोपर्यंत समाजातील तरुणवर्ग स्विकारणार नाही,तोवर या समाजाला प्रगतीची कवाडे उघडली जाणार नाहीत. समाजाचे भले करण्यासाठी गेल्या काही वर्षात अनेक सामाजिक संस्थांचे अतोनात पीक आले.त्यानी शासकिय अनुदाने लुटली,परदेशातून आर्थिक मदत मिळवली. संघटना सुदृढ़ झाल्या,परंतु समाज मात्र अधिकाधिक कुपोषित होत गेला.या समाजाला राष्ट्राच्या प्रवाहात आणण्याचे काम आदिवासी समाजातील तरुणांनी पुढाकार घेऊन करायला हवे.त्यासाठी तरुणांनी मरगळ झटकून कामाला लागण्याची गरज आहे.

