दीपक मोहिते,
” विध्वंस,” भाग क्र.३,
गरजेपेक्षा अधिक पैसा आला की तो पापाला आमंत्रण देत असतो…
एकेकाळी वसई विरार परिसराची ओळख,ही ” मुंबईची फूफ्फुसे,” अशी होती,ती निकामी करण्याचे पाप काही मूठभर बिल्डर्सनी केली व वसईच्या वाताहतीला सुरुवात झाली.अल्पावधीत ” ऐतिहासिक वसई,” ची ओळख ” गुन्हेगारीचे माहेरघर म्हणजे वसई,” अशी होत गेली.वसईचे नामकरण करणाऱ्या या टोळीत कालांतराने अनेक तरुण मोठ्या संख्येने सामील होत गेले.जमिनी हडप करणे,अनधिकृत बांधकामे उभारणे,या कामातून रग्गड पैसा मिळतो,हे लक्षात आल्यानंतर या टोळीत हवशे नवश्याची संख्या वाढत गेली.कालांतराने या गोरखधंद्यात पोलीस, नगरपरिषदेचे व महसूल विभागाचे कर्मचारी देखील सामील होत गेले.त्यामुळे लचके तोडण्यास वेगाने सुरुवात झाली.२००० पर्यंत वसई,नालासोपारा व वसई या तीन शहरात ६० हजाराहून अधिक अनधिकृत बांधकामे डौलात उभी राहिली.आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व अनधिकृत बांधकामांना पाणी,रस्ते,आरोग्य व वीज इ.नागरी सुविधा सहज उपलब्ध झाल्या.याच काळात ” लोड बेअरिंग,” व ” सिडको/ कलेक्टर पासिंग,” दोन शब्द बाजारात चांगलेच प्रचलित झाले.या दोन शब्दांनी लाखो कुटुंबियाची घोर फसवणूक केली.सर्व नागरी सुविधा हात जोडून समोर उभ्या राहिल्यामुळे अनधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा आनंद गगनात मावेनासा झाला.अशा पद्धतीने वसई विरारचा कायापालट झाला.यालाच आपण विकास म्हणतो,पण ती एकप्रकारे आपली फसवणूकच होती.सदर बाब ही आपणच आपली फसवणुक करून घेणारी होती.एका ऐतिहासिक नगरीची वाताहत होत गेली.या ऐतिहासिक कामाला यंत्रणेतील सगळ्यांचाच हातभार लागला व हिरवेगारपणा इतिहासात जमा झाला.दरम्यान २०१० साली महानगरपालिका स्थापन झाली व अनधिकृत बांधकामाचा वेलू गगनावर पोहोचला.आयुक्त,अति.
आयुक्त,उपायुक्त,प्र.सहा. आयुक्त,अभियंते व नगरसेवक यांनी खिसे भरायला सुरुवात केली ते आजपर्यंत..
१९८० ते २०१० या तीन दशकात महसूल विभागाचे मंडळ अधिकारी,तलाठी व कर्मचारी मोकळ्या
जमिनीचे सातबरे घेऊन बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयात कसे पहायला मिळत होते,हा एक वेगळा अध्याय आहे.तो उर्वरित भागात आपण पाहणार आहोत.पैसा आला की गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत जाते,याचे उत्तम उदाहरण म्हणजे ” आपली वसई,” होय.पण पैश्याचा हा माज आता उतरण्याच्या मार्गाला लागल्याचे पाहायला मिळत आहे.सदर बाब दिलासा देणारी असली तरी त्यातून सर्वसामान्यांना न्याय मिळू शकेल,असे वाटत नाही.त्या ४१ अनधिकृत इमारतीमधील ४०० कुटुंबांचे संसार आज रस्त्यावर आले आहेत.राजकारण्यांनी त्याना तोंडभरून आश्वासने दिली आहेत,पण प्रत्यक्षात कृती शून्य…राजकारणी लोकांचे उंबरठे झिजवत एक दिवस या कुटुंबांचे कर्ते काळाच्या पडद्याआड जातील,पण त्यांना जिवंतपणी न्याय मिळू शकणार नाही.
क्रमशः

