दीपक मोहिते,
निवडणुकीचे बिगुल वाजले,
लाडक्या बहिणी योजनेचे श्रेय एकट्याने लाटण्याचा शिंदे यांचा प्रयत्न ; भाजपमध्ये तीव्र नाराजी,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून या निवडणुका तीन टप्यात होणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर राजकीय पक्षाच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामाला लागले आहेत.काल त्यांनी पालघर येथे पक्षाचे वरिष्ठ नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती.या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली,तसेच मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षाच्या काळात आपण कसं काम केलं यावर त्यांनी आपला फोकस ठेवला.त्यांच्या भाषणाचा ८० टक्के वेळ,हा आपण मुख्यमंत्री म्हणून किती व कसं काम केले,यावर खर्ची पडला.या बैठकीत त्यांनी केलेले भाषण हे आत्मकेंद्रित अशा स्वरूपाचे होते.तसेच त्यांनी आपल्या भाषणात महायुतीचा उल्लेख न करता प्रत्येक वेळी केवळ आपल्या शिवसेनेचाच उल्लेख केला.वास्तविक युती असताना इतर घटक पक्षाचा त्यांनी उल्लेख करायला हवा होता.ही बैठक शिवसेनेची होती,हे जरी खरे असले तरी त्यांनी सरकार चालवण्यामध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षाना श्रेय देण्याचे टाळले,हे भाजपला पसंत पडले नाही. ” लाडकी बहिणी योजना, ” मी सुरू केली,त्यामुळे विरोधकांचा धुव्वा उडाला,सांगताना या योजनेचे श्रेय लाटण्याचा त्यांनी प्रयत्न केला.तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या शिवसेनेला जिंकाव्या लागतील,असे सांगताना त्यांनी या निवडणुका आपण स्वबळावर लढण्याचे अप्रत्यक्षरीत्या संकेत दिले.या बैठकीला रविंद्र फाटक,निलेश सांबरे,निलेश तेंडोलकर,कुंदन संख्ये,वसंत चव्हाण,आ.राजेंद्र गावित,आ.विलास तरे,माजी आ.श्रीनिवास वनगा,अमित घोडा व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

