दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
नेहरुंचा आधार घेऊन आणखी किती दिवस काढणार ? शहा व मोदीना जळी स्थळी नेहरूच दिसतात….
पहलगामचे हत्याकांड व त्यानंतर झालेले भारत – पाक युद्ध,त्यासाठी राबवण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर व त्यानंतर अचानक झालेला युद्धविराम,यावर चर्चा करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मोदी यांच्या सरकारने १६ तास राखून ठेवले होते.पण या चर्चेदरम्यान विरोधकांनी मोदी सरकारची लक्तरे वेशीला टांगली गेली.विरोधकांनी चढवलेल्या हल्ल्याला मोदी,राजनाथसिंग व अमित शहा हे तिघे तोंड देऊ शकले नाहीत.
युद्धात ज्या काही घडामोडी घडल्या,त्यावर चर्चा करण्याऐवजी हे तिघेही नेहरू,सरदार पटेल,इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत त्यांनी काय केले ? यावर भर देत राहिले.नेहरूंची जेवढी आठवण काँग्रेसजन करत नाही,त्याहीपेक्षा तिप्पट पटीने हे तिघे नेहरू यांच्यावर तोंडसुख घेण्यात धन्यता मानत होते.नेहरू व इंदिरा गांधी यांनी काय केले ? असा प्रश्न विचारत त्यांनी इतिहासाची मोडतोड करत संसदेची दिशाभूल केली.वायफळ बडबड करण्यात मोदी व शहा यानी कोणतीच कसर बाकी ठेवली नव्हती.राजनाथसिंह यांनी तर निवेदन करताना आपल्या अकलेचे तारेच तोडले.या युद्धात भारतीय हवाई दलाची पाच विमाने शत्रू राष्ट्राने पाडली.त्या अपघातात आपले दहा अधिकारी शहीद झाले.पण संरक्षणमंत्री राजनाथसिंग म्हणाले,या युद्धात आपली बिलकुल जीवितहानी झाली.संरक्षणमंत्री धादांत खोटे बोलले,पण लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी त्यांच्या या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले.सरकारने अनेक संवेदनशील विषयी सभागृहाची दिशाभूल केली.वास्तविक लोकसभेच्या सभापतीनीं त्यांच्यावर कारवाई करायला हवी होती.पण तेवढे धाडस सभापती ओम बिर्ला यांच्याकडे नाही.अमित शहा हे चर्चेदरम्यान ” मी इतिहासाचा विद्यार्थी असुन मला इतिहासाची चांगली जाण असल्याचे, ” ओरडून सांगत होते.सरदार वल्लभभाई पटेल यांचा मृत्यू १९५० मध्ये झाला असताना ते १९६० मध्ये पटेल यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत होते.या युद्धात उभयपक्षी युद्धविरामाची घोषणा आपल्या भूमीवरून झाली नाही तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यालयातून केली. याविषयी प्रियांका गांधी यांनी मोदी यांचे धिंडवडे काढले तर राहुल गांधी यांनी डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत असतील,तर मोदी यांनी सभागृहासमोर येऊन ट्रम्प खोटारडे आहेत,असे सांगावे,असे आव्हान दिले. पण मोदी यांनी ते आव्हान स्विकारले नाही.सिंदूर ऑपरेशन दरम्यान आपली गोदी मिडिया,आपल्या फौजा कराची व इस्लामाबादला पोहोचल्या असुन पाकव्याप्त काश्मीर आपण लवकरच ताब्यात घेणार असल्याचे सांगत होती.त्याचवेळी पाकच्या फौजा पुंछ व राजौरी गावातील रहिवाशांच्या घरावर तोफांचा भडीमार करत होत्या. हा विषय विरोधकांनी चर्चेत आणू नये,यासाठी शहा व मोदी,हे दोघे नेहरूने काय केले ? हा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते.पण प्रियांका व राहुल,या दोघा भावंडानी त्यांच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली.१६ तासाच्या मॅरेथॉन चर्चेत सत्ताधारी पक्ष प्रत्येकवेळी पिछाडीवर गेल्याचे पाहायला मिळाले.यावेळी प्रियांका गांधी यांनी देशाचे परराष्ट्र,संरक्षण व आर्थिक धोरण कसे लयाला गेले,याचा पाढाच वाचला, त्यामुळे सरकार अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले.नेहरूचा आधार घेत सरकार आपले अपयश लपवत असल्याचे संकेत यानिमित्ताने भारतीय जनतेमध्ये गेले.हा विरोधी पक्षाचा खऱ्या अर्थाने विजय असल्याचे मानण्यात येत आहे.

