दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
मुंबईसह पालघर/ठाण्यातील वाहतूककोंडी ; सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा…
हल्ली मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर होणाऱ्या सततच्या वाहतूककोंडीमुळे मुंबई,ठाणे व पालघर या तीन जिल्ह्यातील व्यापार उदिमावर परिणाम जाणवू लागला आहे.गेले वर्षभर या महामार्गाचे कॉक्रिटीकरण व रुंदीकरणाचे काम सूरू आहे. हे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे.त्यामुळे मुंबई, पालघर,ठाणे व गुजरात राज्यातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.मात्र लोकांच्या शेकडो तक्रारीनंतरही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी त्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत.

या चारही महानगराची लोकसंख्या आजमितीस चार कोटीच्या घरात पोहोचली आहे.लोकसंख्या वाढली तसेच वाहनाच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ होत गेली.पण रस्त्यामध्ये वाढ झाली नाही.

मेट्रो,सागरी दृतगती मार्ग,महामार्गाचे आठ पदरीकरण तसेच महामार्गाला लागून पर्यायी मार्ग उभारणे,इ. कामाना प्राधान्य द्यायला हवे.या महामार्गांवर होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे वाहनाच्या दहा ते पंधरा कि.मी.लांबच्या लांब रांगा लागतात.त्यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना वेळेवर कामावर पोहोचता येत नाही. तसेच महामार्गालगत असलेल्या गावात राहणाऱ्या रहिवाश्याना देखील आपल्या दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडता येत नाही.शहरात पोहोचल्यानंतरही नागरिकांना तेथेही वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.मुंबई पाठोपाठ ठाणे व पालघर या जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी नागरिकरणाचे वारे वाहू लागले होते.ते लक्षात घेऊन राज्य सरकारने नियोजन करणे आवश्यक होते.ते न झाल्यामुळे आज या तीनही शहरातील नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.आजवर सरकारच्या करंटेपणामुळे नागरिक अनेक समस्याना तोंड देत आले आहेत.निदान आता तरी सरकारने या प्रकरणी ठोस तसेच लोकांना दिलासा मिळेल,अशा पद्धतीने कार्यवाही करावी,अशी अपेक्षा आहे.आम्ही सरकारला टोल,रोड टॅक्स व अन्य कराच्या रूपाने वर्षाकाठी अब्जावधी रु.अदा करतो, त्याबदल्यात आम्हाला काय मिळते ? या प्रश्नाचे उत्तर आहे, ” केवळ मनस्ताप,”

