दीपक मोहिते,
” देवाभाऊंचा रडीचा डाव,”
माणिकरत्न आता क्रीडामंत्री झाले ; आता दिवसरात्र ” रमी,” खेळ म्हणावं….
देवाभाऊंनी माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नावाच्या माणिकरत्नाला ” पब्लिक क्राय,” डावलून आता क्रीडामंत्री केले आहे.क्रीडा खाते मिळाल्यानंतर हे माणिकरत्न आता आपला रमीचा खेळ मोठ्या जोमाने खेळून दाखवणार आहेत.” वारे वा देवाभाऊ,तुम्ही अगदी आवेशात हे सारे ” करून दाखवले,”
असाच निकष आता संजय शिरसाठ,संजय गायकवाड,भरत गोगावले,संजय राठोड या चौघांनाही लावण्यात यावा,अशी आमची इच्छा आहे.आज हे मंत्री कम गुन्हेगार,तुमच्यामुळे मोकाट सुटले आहेत.जे माणिकरत्न तुमच्या सरकारला भिकारी म्हणते,त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता,एवढा लाचार मुख्यमंत्री उभ्या महाराष्ट्राने गेल्या ६५ वर्षात कधीही पाहिला नव्हता.आता या माणिकरत्नाला म्हणावं, तुला क्रीडामंत्रीपद दिलंय,आता मनसोक्तपणे खेळ… आता तर तु ठरवलेल्या भिकारी सरकारने खेळण्यासाठी तुला एकप्रकारे परवानाच दिला आहे.उघडे नागडे फिरणारे आमदार,कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे,शेतकऱ्यांची औकात काढणारे,धरणात मुतणारे,गोरगरिबांचे मुडदे पाडणारे,मशिदीत घुसून मारण्याची भाषा करणारे,आम्ही काय खावे,काय खाऊ नये,असा सज्जड दम देणारे,अशा साऱ्या हवशे नवश्याना
सोबत घेऊन देवाभाऊ,तुम्ही या पुरोगामी महाराष्ट्राला कुठे घेऊन चालला आहात ?
सत्तेसाठी इतका लाचार झालेला मुख्यमंत्री आम्ही आजवर कधीच पाहिला नाही.संघाच्या मुशीतून तयार झालेला मुख्यमंत्री,अशी तुमची ओळख होती,आज ती पुसली गेली आहे.माणुसकीला काळिमा फासणाऱ्या धनंजय मुंडेला तुम्ही वारंवार भेटता,पण त्या महादेव मुंडेच्या विधवा पत्नीला आपल्याला न्याय मिळावा,यासाठी विषप्राशन करावे लागते,हे कसले लक्षण आहे.धनंजय मुंडे मला तीनवेळा भेटला,पण त्याच्यासोबत राजकीय चर्चा झाली नाही,असे तुम्ही तोंड वर करून सांगता,तो काय तुमच्याकडे तीन पत्ती खेळायला आला होता का ? संतोष देशमुख यांच्या हत्येतील कृष्णा आंधळे हा तुमच्या कार्यक्षम पोलिसांना गेल्या आठ महिन्यापासून सापडत नाही तर महादेव मुंडे यांच्या हत्येतील गोट्या गित्ते हा आरोपी गेल्या तीन वर्षांपासून मोकाट फिरतोय आणि सोमनाथ सूर्यवंशी याची पोलीस कोठडीत पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला.त्याच्या आईने आपल्याला न्याय मिळावा,यासाठी सरकारकडे अनेकदा हंबरडा फोडला,पण सरकारच्या हृदयाला पाझर फुटला नाही.अखेर त्या माऊलीने न्यायदेवतेला साकडे घातले व तुम्हाला ओशाळे होत एसआयटी स्थापन करावी लागली.आरोपींना किती काळ पाठीशी घालत राहणार ? अशी सर्व स्थिती असतानाही देवाभाऊ,तुम्ही राज्यभरात फिरून सांगताय की आपला क्राईम रेट इतर राज्याच्या तुलनेत फार खाली आला आहे.दिवसाढवळ्या हत्या होत आहेत.कोयता गँगने सुशिक्षीत व विद्येचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुणेकरांचे जीणे हराम करून टाकले आहे.तरी पण तुम्ही ” गतिमान सरकार,” म्हणून आपला ऊर बडवून घेण्यात धन्यता मानत आहात.सदर बाब ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले,त्यांच्याशी प्रतारणा करण्यासारखी आहे.एकदा का ” कंबरेचे सोडून डोक्याला बांधलं,” की जनतेची पर्वा करायची नाही,असंच तुमचं हे वागणे आहे.आता बहुचर्चित माणिकरत्नाला एकदाचे विधानसभेचे सभागृह,हे रमी खेळण्यासाठी दिवसरात्र मोकळे करून द्या,म्हणजे झालं एकदाच…

