दीपक मोहिते,
अजून वेळ गेलेली नाही…
देवेंद्र फडणवीस व हितेंद्र ठाकूर यांनी लवकरात लवकर भाकरी फिरवायला हवी….
राज्य मंत्रिमंडळातील सात ते आठ बदनाम मंत्र्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याच्या निर्णयाप्रत मुख्यमंत्री फडणवीस आले असून ते आता भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत.तसे संकेत घटक पक्षाच्या प्रमुखांना त्यांनी दिले आहेत.राज्यातील जनतेच्या नाराजीचा फटका महायुतीला बसू नये,यासाठी फडणवीस यांनी आपल्या शर्टाच्या बाह्या वर करण्यास सुरुवात केली आहे.काही मंत्र्यांचा अतिरेकपणा सतत वाढत असल्यामुळे भाजपच्या आमदारांनीही मुख्यमंत्र्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे फडणवीस यांनी आता कारवाईचा बडगा उचलला आहे.त्यांना केंद्रीय नेत्यांकडूनही ग्रीन सिग्नल मिळाला आहे.त्यामुळे या सर्वांची गच्छंती अटळ आहे.
भारतीय राजकारणात जनता ही बदनाम फरीश्त्याना कधीही जवळ करत नाही,असा आजवरचा अनुभव आहे.२०१४ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसलाही असाच जबरदस्त फटका बसला होता.बदनाम लोकांना सोबत घेऊन फार काळ राजकारण करता येत नाही,हे गेल्या ७५ वर्षात अनेकदा अनुभवायला मिळाले.पैश्याच्या हव्यासापोटी हे बदनाम फरीश्ते हल्लीच्या काळात सतत फोफावत चालले आहेत.त्यांचे अशाप्रकारे फोफावणे हे पक्षाच्या उतरणीला कारणीभूत ठरते.याचे उत्तम उदाहरण म्हणून बहुजन विकास आघाडीचे देता येईल.गेल्या दहा वर्षात पक्षाचे अनेक पदाधिकारी,नगरसेवक व कार्यकर्ते असेच बेफाम होत गेले.त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे होत्याचे नव्हते झाले.आजही ठाकूर कुटंबियाविषयी वसईकर जनतेत प्रचंड सहानुभूती आहे.त्यांचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा अनेक ज्येष्ठ पदाधिकारी,नगरसेवक व कार्यकर्त्यांनी ” ओरबाडून खाणे,” असा एकमेव कार्यक्रम राबवल्यामुळे झाला.त्याचा फटका त्यांना चांगलाच बसला.गेली तीन दशके एकहाती असलेली सत्ता भाजपने उखडून टाकली.वास्तविक हितेंद्र ठाकूर यांनी पक्षातील उपद्रवी लोकांवर वेळीच बडगा उचलला असता तर त्यांच्यावर अशी वेळ आली नसती.अनधिकृत बांधकाम व्यवसायिक,ठेकेदार व अनधिकृत फेरीवाल्याकडून वसुली करण्यावरून नगरसेवक व नगरसेविकांमध्ये झालेल्या हाणामाऱ्या,टेंडर घेण्यावरून एकमेकांच्या उरावर बसणे,असे एक ना अनेक प्रकार सातत्याने घडत गेले.त्यामुळे लोकांमध्ये यांच्याविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली.गेल्या निवडणुकीपर्यंत लोकांसमोर अन्य पर्याय नव्हता,पण गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या रूपाने तो लोकांना उपलब्ध झाला व त्यांनी दणका दिला.त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी निदान आता तरी महानगरपालिकेची उमेदवारी देताना ८० % जुन्या नगरसेवकांना डीच्चू देण्याची गरज आहे.त्यांच्या जागी स्वच्छ प्रतिमा असलेल्या तरुण चेहऱ्यांना संधी द्यायला हवी.अन्यथा ” ये रे माझ्या मागल्या,” होण्याची शक्यता आहे.ते होऊ नये,यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत भाकरी फिरवायला हवी.

