दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
सूडाच्या राजकारणामुळे राज्याची वाटचाल अराजकाच्या दिशेने…
राज्याचे राजकारण सध्या मंत्र्यांचे बेलगाम वागणे, मराठी भाषेचे संवर्धन व संरक्षण,अशा दोन विषयाभोवती फिरत आहे.मंत्र्यांच्या मुजोरपणाला पायबंद बसायलाच हवा,याबद्दल दुमत नाही आणि मायबोली मराठी भाषेचा अपमान जर कोणी करत असेल तर त्याला मराठी माणसाचा हिसका कसा असतो,हे दाखवायलाच हवे.पण त्याचबरोबर राज्यात अनेक समस्या आ वासून उभ्या ठाकल्या आहेत.त्या समस्यांना प्राधान्य मिळायला हवे.पण त्याकडे तथाकथित नेत्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.सत्ताधारी बेधुंद वागणे,राज्याच्या प्रगतीवर विपरीत परिणाम करणारे आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या,रोजगार,ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद पडणे,विस्कळीत आरोग्य व वैद्यकीय सेवा,पायाभूत सोयी – सुविधांचा अभाव,वाढती महागाई,जीएसटीचा कहर, उद्योगधंदे वाढीचा
मंदावलेला वेग,शेतमालाला योग्य हमीभाव न मिळणे,मुक्तहस्ते मद्य परवाने वाटप,मतदारांना आकर्षित करण्यासाठी होत असलेली पैश्याची
उधळपट्टी व कर्जाचा वेलू १० लाख कोटीवर पोहोचणे,हे ज्वलंत तसेच महत्वाचे विषय असून
सत्ताधारी व विरोधक याविषयी चकार शब्द काढत नाहीत.वरील सर्व प्रश्न व समस्या ” कॉमन मॅन,” च्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत.पूर्वी मृणाल गोरे,अहिल्याबाई रांगणेकर, प्रेमा पूरव,एसेम व अन्य नेते या विषयावर रान उठवत असत.महागाईच्या विरोधात त्यांचे लाटणे मोर्चा व थाळ्या वाजवणे,अशा आंदोलनाची मंत्र्यांना प्रचंड भिती वाटायची.या आंदोलनकर्त्यांनी त्या काळात अनेक मंत्र्यांना सळो की पळो,करून सोडले होते.रणरागिणींच्या आक्रमकतेचा त्याकाळी मंत्र्यांनी इतका धसला घेला होता की,या लोकांचे आंदोलन जाहीर झाले की मंत्री त्यादिवशी आपल्या कार्यालयात फिरकत नसत.एवढी त्यांची दहशत होती.पण आज हे सारे इतिहासजमा झाले आहे.आता मोर्चे,धरणे व आंदोलने भूतकाळात जमा झाली आहेत.लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नाशी आपले काही देणेघेणे नाही,अशा पद्धतीने सत्ताधारी व विरोधक वागत आहेत.हल्लीचे राजकारण ” टेंडर व टक्केवारी,” याभोवती फिरत आहे.त्यातून निर्माण होतेय ” सुडाचे राजकारण,” हेच राजकारण पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाणाऱ्या महाराष्ट्राच्या मुळावर आले आहे.तपास यंत्रणेच्या सहाय्याने विरोधकांना संपवण्याचे तंत्र जे सत्ताधाऱ्यानी अवलंबले आहे,ते पाहता येणाऱ्या काळात आपल्या राज्याची वाटचाल एकाधिकारशाहीच्या दिशेने सुरू झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

