दीपक मोहिते,
राज्यात चांगला पाऊस, विदर्भ जिल्हा मात्र उपेक्षितच…
राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होत आहे,त्यामुळे विदर्भ वगळता उर्वरित राज्यातील बळीराजा यंदा सुखावला आहे.निसर्गाच्या या कृपेमुळे,ग्रामीण भागात सध्या शेतीच्या कामाना वेग आला आहे.यंदा
ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळेल,अशी अपेक्षा करायला हरकत नाही.विदर्भातील अकरा जिल्ह्यांपैकी सहा जिल्हे अद्यापही कोरडे आहेत.विदर्भाच्या एकूण अकरा जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण ६ टक्क्यांनी कमी आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात पर्जन्यमान सतत उतरणीवर लागले आहे.त्यामुळे शेती करायची कशी ? अशा विवंचनेत शेतकरी सापडला होता.यंदाचे वर्ष मात्र त्यास अपवाद ठरले आहे.यावर्षी मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून राज्यात पावसाला सुरुवात झाली,आजमितीस तो शेतीसाठी पुरेसा नसला तरी यंदा चांगले पीक शेतकऱ्यांच्या हाती येण्याची आहे.भंडारा,गोंदिया,अमरावती,नागपूर,गडचिरोली व वर्धा हे सहा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले.भंडारा जिल्ह्यात ३६ %,गोंदिया : २७ %,,अमरावती : २८ %,नागपूर : ३९ %,वर्धा : १९ % व गडचिरोली : ३६ %,त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.या महिन्यात पुरेसा पाऊस पडेल,अशी अपेक्षा या भागातील शेतकरी करत आहेत.
राज्याच्या इतर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले असताना विदर्भात मात्र पावसाने ” ये रे माझ्या मागल्या,” या उक्तीनुसार आपले वागणे सुरूच ठेवले आहे.राज्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या या विदर्भ व मराठवाड्यात झाल्या.या दोन विभागांपैकी यंदा मराठवाड्याची स्थिती काहीशी बरी असून या विभागात यंदा पाऊस चांगला झाला आहे.त्यामुळे येथील शेतकरी आनंदात आहेत.विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत,त्यामुळे सरकारने या जिल्ह्यात शेतीसिंचनाचे अन्य पर्याय उपलब्ध करणे,आवश्यक ठरते,किंवा जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीरीत्या व्हावीत,यासाठी पावले उचलायला हवीत.

