दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
महानगरपालिका निवडणुका ; स्वच्छ चारित्र्य व प्रतिमा असलेल्या व्यक्तींना संधी न दिल्यास पुन्हा कपाळमोक्ष होण्याची शक्यता,
भाजपचा उधळलेला अश्वमेघ घोडा रोखण्यासाठी ठाकरे बंधू यांनी काल गळ्यात गळा घालत मराठी माणसाच्या इच्छा व आकांक्षेवर फुंकर मारली.तर शरद पवार व अजित पवार हे दोघे काका – पुतण्या देखील अधून मधून एकत्र येण्याची भाषा करत आहेत.राज्यातील अनेक राजकीय कुटुंबे भाजपच्या कटकारस्थानामुळे गेल्या काही वर्षात दुभंगली गेली.वर्षानुवर्षे सत्तेची अनेक पदे उपभोगणारे एकनाथ शिंदे याना ईडीची भिती दाखवून भाजपने आपल्या गळाला लावले.अशी अनेक उदाहरणे गेल्या तीन ते चार वर्षात आपल्याला पहायला मिळाली.” सत्तेसाठी काय पण,” असे धोरण राबवत भाजपने अनेक राज्यात सत्ता मिळवली.अजित पवार यांचीही भाजपने अशीच गत केली.सत्तेची हाव आणि ईडीची टांगती तलवार,अशा वैयक्तिक फायदा व अटकेची भिती, त्यामुळे अजित पवार यांनीही अमित शहासमोर साक्षात दंडवत घातले.पण आता एकनाथ शिंदे हे नाराज अवस्थेत अधून मधून आपल्या मूळगावी ( सातारा जिल्ह्यातील दरे गाव ) स्थिरावू लागले आहेत.तर अजित पवार यांच्या सैरभैर वागण्याला लगाम घालण्याची मागणी भाजपमध्ये जोर धरू लागली आहे.त्यामुळे त्यांच्याही मनात माघारी फिरण्याचे विचार घोळू लागले आहेत.कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाची झुल आपल्या अंगावर चढावी,अशी ईर्षा बाळगणारे अजित पवार आज ना उद्या आपल्याला चांगले दिवस येतील,या आशेवर महायुतीमध्ये तग धरून आहेत.आजच्या घडीला
असे अनेक नेते देशभरात आपल्याला पाहायला मिळत आहेत,ज्यांनी आपल्या नातेवाईकांचा विचार न करता आपल्या स्वार्थासाठी भाजपच्या नादी लागून स्वतःचीच घरे फोडली.पालघर जिल्ह्यातील असेच एका कुटुंबाचे घर फोडण्यात भाजप यशस्वी ठरले आहे.हे घर फुटले आणि वसईच्या राजकारणात गेली तीस वर्षे वर्चस्व असलेल्या या कुटुंबाला आपली सत्ता गमवावी लागली.या कुटुंबाच्या फुटीला भाजप जितका जबाबदार आहे,तितकेच जबाबदार दोघे भाऊ देखील आहेत.बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन दोघांनी बदलायला हवे होते,पण सत्तेत वाटेकरी नको,अशा उद्देशामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे ” होत्याचे नव्हते,” झाले.गेल्या दोन ते तीन वर्षात पक्षाची
विश्वासार्हता घसरणीला लागली होती.राजकीय उलाढालीचे विश्लेषण करणाऱ्या एका पत्रकार मित्राने वेळोवेळी पत्रे ( अठरा पत्रे ) पाठवून सावध केले होते.पण त्याच्या सर्व पत्रांना त्याच्या मित्राने केराची टोपली दाखवली.त्या पत्रातून या पत्रकाराने ” इंदिरा गांधी यांच्या पाठीला तसेच अटलबिहारी वाजपेयी यांच्या गुडघ्याला देखील माती लागली होती,” याकडे आपल्या मित्राचे लक्ष वेधले होते.तसेच महानगरपालिकेत वाहणाऱ्या भ्रष्टाचारांच्या गंगेत आपले नगरसेवक,मनपा अधिकारी व ठेकेदार कसे हात धुवून घेत आहेत,यावर आपल्या पत्रात प्रकाशझोत टाकला होता.पण त्या पत्रकाराच्या इशाऱ्याकडे कानाडोळा करण्यात त्यांनी धन्यता मानली.गेल्या पंधरा वर्षात
महागरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते व गटार बांधणी कामात झालेल्या भ्रष्टाचाराने मनपाच्या तिजोरीत खडखडाट होत गेला.तिजोरीत पैसा आला की तो एकजुटीने लुटायचा,हा आपला ” जन्मसिद्ध हक्क आहे,” या न्यायाने लोकप्रतिनिधी,मनपा अधिकारी व ठेकेदारांनी तो लुटला.नालेसफाईच्या निविदानी या तिघांची घरे भरली,पण करदात्यांच्या पैशाचे विश्वस्त म्हणून त्याची राखण कोणीच केली नाही.त्यामुळे आज महानगरपालिकेची अवस्था ” भ्रष्टाचाराचे कुरण,” अशी झाली आहे.या सर्वाचा परिणाम तालुक्याच्या विकासकामांवर होत गेला.सार्वजनिक बांधकाम विभागापाठोपाठ पाणीपुरवठा विभाग भ्रष्टाचाराच्या क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकवण्यात यशस्वी झाला.त्यानंतर इलेक्ट्रिक विभाग व महिला / बालकल्याण विभागाच्या साहित्य बोगस खरेदीने करदात्यांचे डोळे अक्षरशः पांढरे झाले.या सर्व घडामोडीमुळे मतदार आपल्यापासून दूरावत चालले आहेत,ते या मंडळींना कळूही शकले नाही.मतदारांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या उन्मत्त झालेल्या मंडळीचे विमान जमिनीवर आणण्याचे ऐतिहासिक काम पार पाडले.आजही परिस्थितीत कोणातही फरक पडलेला नाही.कार्यकर्त्याना आशेची गाजरे दाखवण्याचे काम सुरूच आहे.निवडणुका समीप आल्या की काही पदाधिकारी आपण इतक्या मतांनी विजयी होणार असल्याचे आवर्जून सांगत असतात,पण नेमके होते उलटेच..मतदार हे आपल्या वक्तव्यावर मतदान करत नसतात,हे जरी खरं असले तरी कर्तृत्व नसताना श्रीमंती आलेल्या या लोकांना सांगणार कोण ?
महानगरपालिका निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत,भाजपशी दोन हात करण्यासाठी बहुजन विकास आघाडीने जुन्या नगरसेवक,नगरसेविका व अवती भवती बाडग्यांना दूर सारले पाहिजे.स्वच्छ चारित्र्य व प्रतिमा असलेल्या नव्या चेहऱ्याना यावेळी संधी न दिल्यास लोकसभा व विधानसभा पाठोपाठ या निवडणुकीतही पक्षाचा कपाळमोक्ष होण्याची शक्यता अधिक आहे.

