दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
ठाकरे बंधुचे मनोमिलन ; राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार…
ज्या विजयी मेळाव्याची मराठी भाषिक जनतेला प्रतिक्षा होती,तो ऐतिहासिक मेळावा काल वरळी येथे मोठ्या उत्साहातकाल पार पडला.ठाकरे बंधूनी एकत्र यावे व महाराष्ट्राला वाचवावे,अशी जी अपेक्षा मराठी माणसाकडून व्यक्त करण्यात येत होती.त्यावर या विजयी मेळाव्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.या मेळाव्याला मराठी भाषिकांनी ” न भूतो,न भविष्यती,” अशी गर्दी केली होती.यावेळी राज ठाकरे यांनी या मेळाव्यानंतरही ” आम्ही एकत्रच राहणार आहोत,”अशी ग्वाही दिल्यानंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.दुसरीकडे मात्र या ऐतिहासिक मेळाव्यामुळे भाजप नेत्यांच्या पोटात मळमळ सुरू झाली आहे.शिंदे गटाने मात्र या मेळाव्याबाबत सावध भूमिका घेतली आहे.एकनाथ शिंदे,उदय सामंत व प्रताप सरनाईक यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना राज ठाकरे यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.राज ठाकरे यांनी ” मराठी भाषेवर अन्याय झाला तर तो सहन करणार नाही,या आपल्या भूमिकेचे एकप्रकारे समर्थनच केले.या मेळाव्याचे एकूण दोन उद्देश होते.ठाकरे कुटुंबाच्या दोघा वारसदारांना पुन्हा एकत्र आणणे व मराठी भाषिकांची एकत्रित मोट बांधणे,हे दोन्ही उद्देश,या विजयी मेळाव्यामुळे सफल झाले.

या मेळाव्यात राज ठाकरे यांचे भाषण उद्धव ठाकरे यांच्या भाषणापेक्षा प्रभावी होते.राज ठाकरे म्हणाले,” हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व इतर कोणालाही जमले नाही,ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले.त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला.या वाक्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी बोध घ्यायला हवा.राज पुढे म्हणाले,” तुमची सत्ता विधानसभेत तर आमची रस्त्यावर,” त्यांच्या एका वाक्याने भविष्यात महायुती सरकार पुढे काय वाढून ठेवले आहे,याविषयी त्यांनी एकप्रकारचा संदेश दिला आहे.या दोन बंधूंचे एकत्र येणे,हे राज्यातील राजकरणाची समीकरणे लवकरच बदलत असल्याचे दिसून येत आहे.उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे शिंदे गटाची गद्दारी,फडणवीस यांनी राज्य,अमित शहाच्या दावणीला बांधले,मराठी अस्मिता धुळीला मिळवली,फडणवीस यांनी गुन्हेगारी व फोडाफोडीच्या राजकारणाला हवा दिल्यामुळे राज्य रसातळाला गेले,असे टोणगे मारत,चिमटे काढत जोरदार टीकास्त्र सोडले.
या दोघांच्या भाषणाला कार्यकर्त्यांचा जोरदार प्रतिसाद लाभला.या मेळाव्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वगळता अन्य पक्षाचे सारे नेते झाडून उपस्थित राहिल्यामुळे राज्यात महाविकास आघाडी अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना राज ठाकरे यांची परप्रांतीयांसंदर्भात असलेली आकसाची भूमिका मान्य नसल्यामुळे त्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे टाळले.दुसरीकडे मार्क्स.कम्यु.पक्षाचे वरीष्ठ नेते कॉ.प्रकाश रेड्डी उपस्थित राहिल्यामुळे सर्वांच्या भुवया वर गेल्या होत्या.या क्षणाला राज्याच्या राजकारणात राज व उद्धव,या दोघा ठाकरे बंधूंना अनन्यसाधारण महत्व आले आहे.

