दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
हिंदीची सक्ती ; भाजप व रा.स्व.संघाचे कुटील कारस्थान,
आज शिवसेना ( उबाठा ) व मनसे यांचा वरळी येथे ऐतिहासिक विजयी मेळावा होत आहे.या मेळाव्याबाबत राज्याच्या जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.हिंदी सक्तीच्या प्रश्नावर राज्य सरकारला माघार घ्यावी लागली.त्या पार्श्वभूमीवर हा विजयी मेळावा होत आहे.सरकारकडून झालेली हिंदीची सक्ती व त्यावर मराठी भाषिक जनतेमध्ये उसळलेली संतापाची लाट,त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणूस या विजयी मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होत आहे.हा विजयी मेळावा ऐतिहासिक होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
काल पुणे येथे झालेल्या गुजराती समाजाच्या कार्यक्रमासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या भाषणाच्या शेवटी ” जयहिंद,जय महाराष्ट्र,जय गुजरात,अशी घोषणा केली.त्यामुळे पुन्हा आगीत तेल ओतले गेले.गृहमंत्री अमित शहा हे मराठीद्वेषी असून त्यांच्यासमोर शिंदे यांनी लोटांगण घातल्यामुळे राज्यभरात त्याचे जोरदार पडसाद उमटले.आपल्या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटल्यानंतर शिंदे यांनी घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन सारवासारव केली.
महायुतीच्या नेत्यांकडून मराठी जनतेचा वारंवार होणारा अपमान लक्षात घेता भाजप,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावलेला सापळा आहे.हिंदी भाषिक विरुद्ध मराठी भाषिक,असा संघर्ष निर्माण व्हावा,असा उद्देश या सक्ती मागे होती.तो जवळपास साध्य झाल्याचे स्पष्ट होत आहे.मुंबई व ठाणे शहरात गुजराती,मारवाडी समाजाच्या वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन भाजपने ही खेळी केल्याचे स्पष्ट होत आहे.शिंदे यांचे वक्तव्य,केडीयाचा उर्मटपणा,मीरा – भाईंदर येथे गुजराती व्यवसायिकाला झालेली मारहाण आणि त्यानंतर गुजराती व इतर भाषिक व्यापाऱ्यांचा निघालेला मोर्चा,या सर्व घडामोडी म्हणजे दोन समाजाला एकमेकांसमोर उभे करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.शिवसेना ( उबाठा ) व मनसे मराठी भाषिकांच्या मतांवर डोळा ठेवून भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत,तर हिंदी व गुजराती भाषिकांची माथी भडकवून भाजप आपली राजकीय पोळी भाजू पाहत आहे.शिंदे यांनी काल ” जय गुजरात,” अशी घोषणा करून आम्हाला मराठी भाषिक यांच्यापेक्षा सत्ता महत्वाची आहे,हे दाखवून दिले आहे.आज या विजयी मेळाव्यानंतर ठाकरे बंधूनी भाजप व रा.स्व.संघाचा हा डाव ओळखायला हवा.

