दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
भारतीय संविधान मोडीत काढणे,कदापि शक्य होणार नाही…
गेल्या काही वर्षांपासून भारतीय संविधानाला नख लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.” संविधान,” या शब्दाची आपल्या महायुती सरकारला ऍलर्जी असल्याचे पदोपदी पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे गटाच्या एका महिला आमदाराने सभागृहात वारीमध्ये अर्बन नक्षलवादी संघटनाचा शिरकाव झाल्याचा सनसनाटी आरोप नुकताच केला. याविषयी उदाहरण देताना त्यांनी अर्बन नक्षलवाद्याच्या संघटनेचे नांव ” संविधान वारी,” असल्याचे सांगितले.या वारीच्या वारकरकऱ्यांनी वारीमध्ये संविधानाची पूजा केली,असे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.गेल्या सात दशकात ” संविधान, ” या शब्दाची ऍलर्जी कोणालाच नव्हती. तसेच ” अर्बन नक्षलवाद,” शब्द देखील कुठून आला,हे तुम्हा-आम्हाला कळले देखील नाही. केंद्र व राज्यसरकार एकीकडे नक्षलवाद संपवल्याचा दावा करते,तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाची आमदार वारीत अर्बन नक्षलवादी घुसल्याचा सनसनाटी आरोप करते. या दोन्हीचा मेळ कसा बसवायचा ? सभागृहात शपथ घेताना नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी संविधानाला स्मरून शपथ घेत असतात.देशाचा संपूर्ण कारभार याच संविधानाचा आधार घेऊन करण्यात येत असतो. कदाचित हे त्यांना ठाऊक नसावे किंवा प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांनी असे बेसलेस वक्तव्ये केली असावीत,असे वाटते.ज्या संविधानाने आपल्याला जगण्याचा,बोलण्याचा, शिक्षणाचा व धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिला,त्या भारतीय संविधानातील ” संविधान,” या शब्दाची त्यांना ऍलर्जी असेल, तर त्यांच्या बुद्धीची किंवच करावी लागेल.
ब्रिटिश साम्राज्याच्या जोखडातून मुक्ती मिळाल्याचा आनंद व संविधान अमलबजावणीचा उत्सव म्हणून दरवर्षी हा दिवस आपण साजरा करत असतो.१५ ऑगस्ट १९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वर्षानंतर देशाच्या संविधान समितीने २६ नोव्हें.१९४९ साली संविधानाचा मसुदा स्विकारला व २६ जाने.१९५० रोजी आपले ” संविधान,” अमलात आले.स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपल्याला स्वतःचे संविधान नव्हते.१५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या १४ दिवसात २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली.या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो ४ नोव्हें.१९४७ रोजी सभेसमोर सादर केला.सभागृहात तब्बल तीन वर्षे,या मसुद्यावर चर्चा झाली व त्यानंतर काही महत्वाचे बदल करून समितीने या मसुद्याला अंतिम स्वरूप दिले.अनेक बदल व सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सदस्यांनी २४ जाने.१९५० रोजी मसुद्यावर स्वाक्षऱ्या केल्या.सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे भारतीय संविधान २६ जाने.१९५० रोजी संपूर्ण राष्ट्राला लागू करण्यात आले.अशाप्रकारे आपला देश प्रजासत्ताक झाला,म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो.
दरवर्षी २६ जाने.रोजी देशाच्या राजधानीत विविध राज्याची लोकसंस्कृती,राहणीमान व आपले लष्करी सामर्थ्य,याचे संचलन आयोजित करण्यात येत असते.यावेळी देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना अशोक चक्र व कीर्ती चक्र,हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.असा हा हृद्य सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी अन्य राष्ट्राच्या प्रमुखांना पाचारण करण्यात येते.
स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याला स्वतःचे संविधान नव्हते.आपल्याला लागू असलेले कायदे हे १९३५ च्या कलमावर आधारीत होते.आपल्या लोकशाही व्यवस्थेचे उगमस्थान हे या ” आम्ही भारतीय लोक,” या तीन शब्दातून सांगितलं गेलं आहे.आपल्या संविधानात न्याय,समता,बंधुत्व,राष्ट्रीय एकता व एकात्मता,मूलभूत उद्दीष्टे तर धर्मनिरपेक्ष,लोकशाही व गणराज्य,असे आपल्या व्यवस्थेचे स्वरूप निश्चित करण्यात आले.आज आपले संविधान,हे सर्वश्रेष्ठ म्हणून नावारूपाला आले आहे.कारण सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून ते तयार करण्यात आले आहे.ते तयार करण्यासाठी २ वर्षे ११ महिने व १८ दिवस इतका प्रदीर्घ कालावधी लागला.भारताचे संविधान,हे आदर्श संविधान म्हणून जगभरातील देशांनी पोचपावती दिली आहे.सर्वसामान्यजनाचे हित,अधिकार व हक्क यास संविधानात सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
ब्रिटिश साम्राज्याच्या उत्तरार्धात हिंदुस्थानातील परिस्थिती झपाट्याने बिघडत असल्याचे पाहून ब्रिटीश राज्यकर्त्यांनी १९४५ सालापासून आपला गाशा गुंडाळण्याची तयारी चालवली होती.२० फेब्रु.१९४७ रोजी त्यांनी एक महत्वाची घोषणा केली.ती अशी होती,” ब्रिटिश सरकार हे जून १९४८ पूर्वी भारतातील सत्ता सोडतील व ती भारतीय लोकांच्या ताब्यात देईल,” मात्र ही सत्ता,एखाद्या मध्यवर्ती सरकारकडे सोपवायची कि देशाच्या काही प्रांतात असलेल्या प्रांतिक सरकारकडे सोपवायची,यावर निश्चित असा निर्णय होत नव्हता.त्याच सुमारास ब्रिटिश सरकारने लॉर्ड वेव्हेल यांच्या जागी लॉर्ड माऊंटबॅटन यांची व्हाईसरॉय म्हणून नेमणूक केली.त्यांच्या देखरेखीखाली त्रिमंत्री योजनेनुसार हिंदुस्थान व प्रांतिक संस्थाने याचे एक संघराज्य निर्माण करावे,असा निर्णय घेण्यात आला.या संघराज्याकडे परराष्ट्र,संरक्षण,वाहतूक व आर्थिक,असे हक्क सुपूर्त करण्यात आले.जून १९४६ मध्ये काँग्रेस व मुस्लिम लीग यांनी भावी संविधान विषयक त्रिमंत्री योजना स्विकारली.त्यानंतर घटनासमिती समितीची निवड करण्याची प्रक्रिया सुरू केली व ती ठराविक वेळेत पूर्ण झाली.हे काम अत्यंत त्रासदायक व क्लिष्ट असल्यामुळे प्रांतिक विधिमंडळाकडून १० लाख लोकसंख्येला १ प्रतिनिधी या सूत्रानुसार घटना समिती नेमण्यात आली.
त्यानंतर घटना समितीच्या सदस्यांच्या अथक प्रयत्नातून भारतीय संविधानाला मूर्त स्वरूप मिळाले.आज आपले संविधान हे जगभरातील देशांसाठी रोलमॉडेल ठरले आहे.आपल्या संविधानातील तरतुदीचा नव्या भारताच्या जडघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे.या संविधानाने नागरिकांचे हक्क,दर्जा,अधिकार व मान,सन्मान अबाधित राखले.वंश,जात,धर्म व पंथ,या बाबीना मुभा देण्यात आली,पण त्याचा अतिरेक होऊ नये,यासाठी बंधनेही टाकण्यात आली.आज २० व्या शतकाच्या उत्तरार्धात देशाचा जो काही विकास झाला,त्यामध्ये आपल्या संविधानाचा मोलाचा वाटा आहे.समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे,आपले संविधान आज आदर्श संविधान म्हणून ओळखले जाते.परिस्थितीनुसार या संविधानामध्ये दुरुस्ती व बदल करण्यात येत असतात.गेल्या साडेसात दशकात शंभरहून अधिक वेळा दुरुस्त्या करण्यात आल्या.कालानुरूप जशी परिस्थिती बदलते,तसे कायद्यात बदल करणे,आवश्यक असते.मात्र हे बदल करताना संविधानाच्या मूळ ढाच्याला हानी पोहोचणार नाही,याविषयी काळजी घेतली जाते.
आज हे संविधान मोडीत काढण्यासाठी काही शक्ती सक्रिय झाल्या आहेत,पण या देशातील भारतीय नागरिक या शक्तींना यशस्वी होऊ देणार नाहीत,हेही तितकेच खरे आहे.

