दीपक मोहिते,
भयावह वास्तव,
आजही ग्रामीण भाग अंधारात चाचपडतोय…
आपल्या देशाची वाटचाल महासत्ता होण्याच्या दिशेने सुरू झाली असून लवकरच आपली अर्थव्यवस्था पाच ट्रीलियन होईल,असे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या बारा वर्षात पावलोपावली सांगत सुटले आहेत.पण त्यांच्या या दाव्यात किती तथ्य आहे,हे ग्रामीण भागातील स्थिती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते.चालायला धड रस्ते नाही,प्यायला पाणी नाही,आरोग्य व वैद्यकीय सोयी- सुविधांचा अभाव,शिक्षणाचा झालेला बट्याबोळ व कृषी क्षेत्रावर सतत आदळणारी संकटे,विकासकामांच्या नावाखाली भूमीपुत्रांच्या जमिनी लुबाडणे,असे एक ना अनेक गैरप्रकार आपल्या पाचवीला पुजले असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेले दावे किती पोकळ आहेत,हे दिसून आले आहे.

मुंबई शहरापासून अवघ्या साठ की.मी.अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना नदीच्या वाहत्या पाण्याच्या धोकादायक प्रवाहात टायरच्या ट्युबचा आधार घेत प्रवास करावा लागतो. तर याच जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील मलवाडा गावाच्या हद्दीतील म्हसेपाडा येथे गारगाई आणि राखाडी या दोन्ही नद्यांच्या वेगवान प्रवाहाच्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी सातत्याने साकव व पुलाची मागणी केली,पण झारीतील शुक्राचार्यांनी त्याला आजपर्यंत वाटाण्याच्या अक्षता लावण्यात धन्यता मानली.नंदुरबार व अमरावती जिल्ह्यात तर याहून भयानक परिस्थिती पाहायला मिळते.दुसरीकडे आपले सरकार १ लाख कोटी रु.खर्च करून समृद्धी महामार्ग तर आता ८६ हजार कोटी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग बांधत आहे.या कामातून आपल्या मंत्र्यांना कोट्यवधी रु.कमिशन मिळत असते.त्यामुळे आपले मंत्री महामार्ग उभारण्यात वेगवान पुढाकार घेत असतात.साकव व लाकडी पूल बांधण्यामध्ये त्यांना काय दगडी मिळणार.त्यामुळे गेल्या आठ दशकामध्ये ग्रामीण भागात अठरापगड दारिद्र ” जैसे थे,” स्थितीत आहे.आपले विश्वगुरु नरेंद्र मोदी हे आपला देश लवकरच पाच ट्रीलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून नावारूपाला येणार आहे,असा दावा करत आपली ” मन की बात,” मध्ये सांगत सुटले आहेत.पण त्यामध्ये बिलकुल तथ्य नाही.आजही ग्रामीण भाग अंधारात चाचपडत आहे.त्यांच्या जीवनात कधीच उष:काल होणार नाही.

