दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
ईडीच्या धाडी व रविंद्र चव्हाण यांची निवड ; विरोधकांच्या छातीत धडकी,
काल दिवसभरात दोन महत्वाच्या घडामोडी घडल्या.या घडामोडीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे पारडे जड झाले आहे.निवडणुका जिंकण्याचे तंत्र अत्यंत धुर्तपणे आत्मसात करणारे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची निवड व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सक्तवसुली संचलनालयाचे ( ईडी ) पुन्हा सक्रिय होणे,अशा दोन कारणामुळे विरोधकांच्या तंबूत सध्या घबराट निर्माण झाली आहे.सक्तवसुली संचलनालयाचा पालघर जिल्ह्यात लवकरच तिसरा अंक सुरू होणार आहे.या तिसऱ्या अंकामुळे विरोधी पक्षाचे अनेक नेते व माजी नगरसेवकांची ” पळता भुई थोडी,” होणार आहे.अनेक माजी नगरसेवक यंदाची निवडणूक लढवायची की नाही,अशा विवंचनेत सापडले आहेत.कारण अनेक लोकप्रतिनिधी,ठेकेदार व मनपाचे अधिकारी ईडीच्या अडकीत्यात सापडले आहेत.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ईडीने पुन्हा उचल खाल्यामुळे भ्रष्ट नेते,माजी नगरसेवक व महानगरपालिकेचे अधिकारी यांचे धाबे दणाणले आहे.अशा बिकट परिस्थितीमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण,यांची नियुक्ती होणे,ही बाब विरोधी पक्षासाठी ” दुष्काळात तेरावा महिना,” ठरू पाहत आहे.काल पडलेल्या ईडीच्या धाडीमुळे अनेक जण भूमिगत झाले आहेत.काही बिल्डर्स आपला बाडबिस्तरा गुंडाळून गुजरात राज्यात पळ काढण्याच्या प्रयत्नात आहेत.तसेच अनेक ठेकेदार देखील भितीच्या सावटाखाली आले आहेत.भाजपच्या एका नेत्याने महानगरपालिकेच्या विविध विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी तक्रारींचे अठरा अर्ज दिले आहेत.त्यापैकी काल एका प्रकरणात ईडीने दमदार पाऊल टाकले आहे.लवकरच ईडी काही ठेकेदारांना चौकशी
साठी पाचारण करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे ठाणे व वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी बैठकीचा सिलसिला सुरु करण्याच्या तयारीत आहेत.अशा परिस्थितीमध्ये बहुजन विकास आघाडी, महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याच्या प्रयत्नात आहे.आजच्या घडीला वसई- विरार क्षेत्रात त्यांच्या घटक पक्षाची ताकद अगदी नगण्य आहे.त्यामुळे अशाप्रकारचा प्रयत्न बहुजन विकास आघाडीच्या अंगलट येऊ शकतो.पूर्वी नालासोपारा शहरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची थोडीफार ताकद होती,पण गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने ती मोडीत काढली.या दोन्ही निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडीलाही जबरदस्त फटका बसला.मतदारांचा आ.हितेंद्र ठाकूर याना विरोध नाही,पण त्यांच्या अवतीभवती असलेल्या बडव्यांना मात्र वसईकर जनतेचा कडवा विरोध आहे.या बडव्यांनी गेली दोन दशके केवळ ओरबडण्याचेच काम केले.या बडव्यांना पक्षाच्या हिताशी कधीच देणे घेणे नव्हते.महानगरपालिकेची
मुदत संपल्यानंतर अनेक नगरसेवकांनी तर आपली कार्यालये बंद करून टाकली.आता तेच नगरसेवक निवडणुकीच्या तोंडावर महानगरपालिका मुख्यालयात आयुक्तांसमवेत बैठका घेऊन विकासकामांवर चर्चा करताना पाहायला मिळतात.अनेक वर्षे सत्तेत असताना शहराच्या विकासकामाकडे कायम दुर्लक्ष करणारे माजी नगरसेवक व नगरसेविका हे प्रशासनाकडून होत असलेल्या कामाच्या ठिकाणी उभे राहून सेल्फी काढण्यात धन्यता मानत आहेत.सत्तेत असताना लोकाभिमुख कामे केली असती तर त्यांच्यावर ही पाळी आली नसती.पण या नतद्रष्ट लोकप्रतिनिधीना सांगणार कोण ?

