दीपक मोहिते,
बविआशी ” साथसंगत नको रे बाबा,” काँग्रेसजनांची प्रखर भूमिका,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली वसई विरार जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक बैठक टिळक भवनात नुकतीच पार पडली.या बैठकीला प्रमुख पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली होती.वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यापूर्वी प्रदेशाध्यक्षपदी असलेले नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यात काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.राज्यातही पक्षाची प्रचंड वाताहत झाली.त्यामुळे नाना पटोले याना पक्षश्रेष्टींनी डच्चू दिला व त्यांच्या जागी हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लावली.पण गेल्या सहा महिन्यांच्या काळात सपकाळ हे स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू शकले नाही.पक्षात आलेली मरगळ दूर करून पक्षाला उभारी देण्यासंदर्भात त्यांच्याकडून फारसे काही झाले नाही.गेली अनेक वर्षे जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा आपल्या अस्तित्वाच्या शोधात आहे.पक्षाकडे कार्यकर्ते नसल्यामुळे
आंदोलने,निदर्शने व धरणे आदी कार्यक्रम पक्षाला राबवता आले नाही.तसेच निवडणूक लढवण्यासाठी साधे कार्यकर्ते देखील मिळत नसल्यामुळे जिल्हा परिषद,पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुका लढवण्याचे त्यांनी आजवर टाळले.पण येत्या ऑक्टो.महिन्यात होणारी महानगरपालिका निवडणुका लढवण्याबाबत प्रदेशाध्यक्ष आग्रही आहेत.पण त्या लढवायच्या कशा ? अशा विवंचनेत पक्षाचे नेते सापडले आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून काही मूठभर कार्यकर्ते हे पक्षाचे नेते वसईच्या दौऱ्यावर आले की त्यांच्यासमोर पुढे पुढे करण्यात धन्यता मांडत असतात.लोकांशी असलेला संवाद गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून तुटला आहे.पक्षकार्य न करता केवळ खोटे कार्य अहवाल तयार करून ते वरिष्ठाना सादर करण्याची नौटंकी हे तथाकथित स्वयंभु नेते आवर्जून करत असतात.त्यांच्या या कार्य अहवालाची वरिष्ठ नेतेदेखील दखल न घेता त्याला केराची टोपली दाखवत असतात.पालघर जिल्ह्यात विशेष करून वसई तालुक्यात आपल्या पक्षाच्या ताकदीची कल्पना असल्यामुळे तेही कार्यकर्त्यांकडून फारशा अपेक्षा ठेवत नाहीत.मात्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन
सपकाळ यांना जिल्ह्याची फारशी ओळख अभ्यास नसल्यामुळे त्यांनी सर्वप्रथम वसई विरार जिल्हा काँग्रेसची बैठक. बोलावली.या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीशी युती करण्याबाबत चर्चा केली. अनेकांनी त्यांच्याशी युती? करण्यास कडाडून विरोध केला.आपला पराभव झाला तरी हरकत नाही,पण बहुजन विकास आघाडी सोबत हातमिळवणी करणे,आपल्यासाठी नुकसानीचे ठरेल.असे अनेक पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवले.आघाडीच्या एकंदरीत कारभाराबाबत लोकामध्ये प्रचंड नाराजी आहे.अशावेळी त्यांच्या समवेत आपण निवडणूक लढवल्यास आपल्यालाही प्रचंड नुकसान सोसावे लागेल.त्यामुळे या निवडणुकीत भले आपला पराभव होवो,” पण त्यांची संगत नको रे बाबा,” अशी भूमिका या सर्व पदाधिकाऱ्यांनी
मांडली.आता याविषयी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काय भूमिका घेतात ? याकडे काँग्रेसजनांचे लक्ष लागले आहे.

