दीपक मोहिते,
शिवसेनेचा ५९ वा वर्धापनदिन ; अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होतोय साजरा…
शिवसेनेला ( उबाठा ) आज ५९ वर्षे पूर्ण होत आहेत.या प्रदीर्घ वाटचालीत या पक्षाने खूप काही सोसले.अनेक वादळे अंगावर घेतली.त्यातून तावून सुलाखून निघालेल्या या पक्षाने राज्याच्या राजकारणात स्वतःचा असा दबदबा निर्माण केला होता.पक्षाचे संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रछायाखाली इवलाश्या रोपट्याचा अल्पावधीत वटवृक्ष झाला.या वटवृक्षाच्या सावलीत हळूहळू भाजपचे झाडही वाढत गेले.कालांतराने भाजपच्या या झाडांच्या पारंब्यांनी सेनेचा गळा आवळण्यास सुरुवात केली.अवघ्या तीन वर्षात या वटवृक्षाचे सुकलेल्या झाडात रूपांतर झाले.सत्तेसाठी हपापलेल्या भाजपने २०१९ साली दिलेला शब्द न पाळल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी युती मोडीत काढली व राज्यात महाविकास आघाडीचा नावीन्यपूर्ण प्रयोग अमलात आणला.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सर्व काही सुरळीत सुरू असताना भाजपने शिवसेना फोडण्याचे पातक केले.” ईडीची कोठडी,” या दोन शब्दांनी भयभीत झालेल्या एकनाथ शिंदे,यांची भाजपने पहिली शिकार केली. अनेक दिवस हे सावज ताब्यात येत नसल्याचे पाहून भाजपच्या दिल्लीश्वरांनी शिंदे यांना शेवटचा अल्टीमेटम दिला. ” बाहेर पडा,अन्यथा ईडीच्या कोठडीत जा,”असा निर्वाणीचा निरोप मिळाल्यानंतर शिंदे साहेब आपल्या ३६ आमदारासह व्हाया सुरत गुवाहाटीमध्ये दाखल झाले.त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारापैकी ७० ते ८० % आमदारही ईडीच्या कोठडीची भिती उराशी बाळगून होते.त्यांच्या पळून जाण्याने उद्धव ठाकरे यांचे अल्पमतात आलेले सरकार सत्तेतून पायउतार झाले.या क्षणापासून पक्षाची पडझड सुरू झाली ती आजतागायत सुरूच आहे.सेनेला महाराष्ट्रातून नामशेष करण्याचा विडा भाजपने उचलल्याचे या सर्व घडामोडीवरून स्पष्ट झाले.

मराठी लोकांची संघटना म्हणून उदयाला आलेल्या या पक्षाची अशी वाताहत होईल, असे मराठी माणसाला अपेक्षित नव्हते.गेल्या ५९ वर्षांत शिवसेनेनं कोणकोणती वादळं झेलली,यासाठी त्यांच्या वाटचालीचा आढावा घेणे आवश्यक ठरते.
आज शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन आहे.१९ जून १९६६ रोजी शिवसेना पक्षाची स्थापना झाली.मराठी लोकांनी मराठी माणसासाठी उभारलेली ” संघटना,” म्हणून उदयाला आलेल्या संस्थेचं सदस्यत्व मिळावं,यासाठी धडपड सुरू केली.सुरुवातीच्या काळात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देण्याची घोषणा करण्यात आली होती.बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या घरातील लोक व निवडक सहकाऱ्यांच्या मदतीने शिवसेना उद्घाटनाचा सोहळा पार पाडला.प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून ” छत्रपती शिवाजी महाराज की जय,” असा उद्घोष करत शिवसेना स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आली.बाळासाहेबांचे अनेक सहकारी याप्रसंगी आवर्जून हजर होते.त्यामध्ये दत्ताजी साळवी,प्रमोद नवलकर,वामनराव महाडिक, दत्ता नलावडे यांचा समावेश आहे.हे सारे आता काळाच्या पडद्याआड गेले असुन शेवटपर्यंत त्यानी बाळासाहेबाना साथ दिली.शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टो.१९६६ रोजी विजया दशमीच्या दिवशी पार पडला.
शिवसेनेने १९६७ साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाने राज्याच्या राजकारणात प्रवेश केला.तसेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचारही केला.त्याच्या पुढच्या वर्षी प्रजा समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक लढवून मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला.त्यानंतर शिवसेनेच्या शाखा सर्वत्र दिसू लागल्या.शिवसेना शाखांकडे आपले प्रश्न सोडवण्याचे एक व्यासपीठ म्हणून लोक सेनेकडे आशेने पाहू लागले.सेनेचे पहिले महापौर खुर्चीत बसायला तब्बल पाच वर्षे लागली.त्यासाठी १९७१ साल उजाडावे लागले.दरम्यान १९९५ साली युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर छगन भुजबळ हे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक होते,पण बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांना संधी दिली.त्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले.त्याच सुमारास तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांनी मंडल आयोगाचा अहवाल स्विकारला,हा अहवाल आपल्या राज्यसरकारनेही स्विकारावा,असा भुजबळ यांचा आग्रह होता,पण बाळासाहेबांनी तो अव्हेरला. त्यामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला.त्यानंतर
२००३ साली महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनात शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे यांनी या अधिवेशनात एक महत्वाचा ठराव मांडला. शिवसेनाप्रमुख यांना असलेल्या अधिकारानुसार उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेण्यात यावे.तसेच,त्यांची नियुक्ती कार्याध्यक्ष म्हणून करावी,असा हा ठराव होता.हा ठराव मंजूर करण्यात आला आणि अनपेक्षितपणे उद्धव ठाकरे यांच्या हाती पक्षाची धुरा आली.त्यानंतर पुढच्याच वर्षी नारायण राणे यांनी तर २००५ साली राज ठाकरे यांनी पक्षाला रामराम ठोकला.
२०१० साली झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युवा सेनेची घोषणा केली.नातू आदित्य ठाकरे याच्याकडे या नव्या सेनेची जबाबदारी सोपवत असल्याचे त्यांनी जाहीर केले.त्यावेळी ” उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे.त्यांची काळजी घ्या.” असे भावूक उद्गार त्यांनी काढले होते.नातू आदित्य ठाकरे याच्याकडे या नव्या सेनेची जबाबदारी सोपवत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
आदित्य ठाकरे यांची युवासेना प्रमुख नियुक्ती केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी १७ नोव्हें. २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात शिवसेनाप्रमुखपद हे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार अशी चर्चा होती.परंतु,उद्धव यांनी शिवसेनाप्रमुख हे पद रिक्तच राहील,असे जाहीर केले.त्यानंतर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेमध्ये पक्षप्रमुख हे नवे पद निर्माण करण्यात आले आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तसेच सामनाचे संपादक म्हणून त्यांनी कामास सुरूवात केली.
५९ वर्षे वयोमान झालेल्या या शिवसेनेचा पक्ष फुटीनंतरची आता हा चवथा वर्धापन दिन साजरा होत आहे.यंदाचा वर्धापनदिन फार गाजावाजा न करता साजरा होईल.पक्षप्रमुख उद्भव ठाकरे,शिवसैनिकाशी थेट संवाद साधणार आहेत.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या संयुक्त नेतृत्वाने महाराष्ट्रात बलाढ्य अशा भाजपला धूळ चारली,पण विधानसभा निवडणुकीत त्यांचे पानिपत झाले.
५९ वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना करताना दिवंगत सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना साथ देणारे अनेक नेते आता हयात नाहीत.त्यामध्ये प्रमोद नवलकर,वामनराव महाडिक,दत्ताजी साळवी,दत्ता नलावडे,यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.काही मंडळी आज हयात असली तरी ते वयोमानामुळे सेनेच्या दैनंदिन कामकाजापासून दूर आहेत.या ५९ वर्षाच्या प्रदीर्घ वाटचालीत सेनेने अनेक चढउतार पाहिले.छगन भुजबळ,राज ठाकरे,नारायण राणे,या आघाडीवरील आक्रमक नेत्यांनी विविध कारणांमुळे बाळासाहेबांची साथ सोडली.मंडल आयोगाच्या शिफारशी स्विकारण्यास सेनेकडून झालेली चालढकल,यावरून छगन भुजबळ यांनी काँग्रेसची वाट धरली.दोन भावात झालेल्या वादात बाळासाहेबांनी उद्धव यांच्या पदरात टाकलेले माप,या एकमेव कारणावरून राज ठाकरे यांनी आपला वेगळा संसार थाटला.मनोहर जोशी व नारायण राणे यांच्या वैमनस्यात बाळासाहेबांनी जोशी यांना संधी दिली.त्यामुळे भुजबळ नाराज होते.सेनेची कमान बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवल्यानंतर उद्धव ठाकरे व राज ठाकरे या भावामध्ये तू तू मै मै नाट्य रंगले व राज यांनी मनसेला जन्म दिला.त्याच सुमारास उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना दूर ठेवण्यास सुरुवात केली.दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता व नारायणराव काँग्रेसवासी झाले.बाळासाहेबांच्या काळात म्हणजे ९० च्या दशकात सेना-भाजप युती आकाराला आली.त्या काळात बाळासाहेब,प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे,यांनी एकत्र येऊन काँग्रेससमोर युतीचा पर्याय उभा केला होता.हिंदुत्वाची प्रखर भूमिका घेत,या तिघांनी महाराष्ट्रात रान उठवून दिले व या माध्यमातून या दोन्ही पक्षांनी ग्रामीण भागात आपले पाय घट्टपणे रोवले.सुरुवातीच्या काळात या दोन्ही पक्षांना शहरी भागात उत्तम प्रतिसाद लाभला,पण ग्रामीण भागात मात्र काँग्रेसची मिरासदारी त्याना मोडून काढता आली नाही.काँग्रेसचे सहकार क्षेत्रातील वर्चस्व,हा फार मोठा अडथळा होता.दरम्यान तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांनी मंडल आयोग स्विकारण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांनी रथयात्रा काढून ” मंडल विरुद्ध कमंडलू ” अशा संघर्षाला फुंकर घातली.” मंदिर वही बनायेगे ” घोषणा,आसमंतात घुमू लागली व हिंदुत्वाचे वादळ सर्वत्र घोंगावू लागले.या वावटळीत बाबरी पडली.त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत युतीने काठावर बहुमत मिळवत ती सत्तेत विराजमान झाली.दोन्ही पक्षाची नाळ घट्ट विणली गेली.वाद होत होते,पण बाळासाहेब,महाजन व मुंडे या तिघांनी ते विकोपाला जाऊ दिले नाहीत.१९९९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत युतीला पराभव पत्करावा लागला,कारण केंद्रात सरकार आल्यानंतरही रामजन्मभूमीचा प्रश्न अधांतरीतच राहिला होता.केंद्रात डॉ.मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार स्थानापन्न झाले.या निवडणुकीनंतर सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्यावरून त्यांना पंतप्रधानपद देण्यास सर्वत्र विरोध झाला व पवारांनी नेमकी तीच संधी साधत आपली वेगळी चूल मांडली.पण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस,या दोन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल,इतके बहुमत मिळाले नाही.त्यामुळे दोघांनी एकत्र येऊन सरकार बनवण्याचा निर्णय घेतला व सलग १५ वर्षे म्हणजे २०१४ पर्यंत त्यांनी कारभार केला.
दरम्यान बाळासाहेब गेले,बाळासाहेबांच्या जाण्यानंतर ” सेना संपली,” अशी हाकाटी सुरू झाली.उद्धव ठाकरे यांना हे शिवधनुष्य पेलवणार नाही,अशी भाकिते करण्यात आली.पण ही सारी भाकिते खोटी ठरवत उद्धव ठाकरे यांनी मुंबई व ठाणे महानगरपालिका एकहाती जिंकून विरोधकांची तोंडे गप्प केली.२०१४ साली झालेल्या निवडणुकीत युतीने बाजी मारली व सत्ता काबीज केली,पण याच दरम्यान युतीमध्ये धुसफूस सुरू झाली होती.भाजपला सेनेशी घरोबा नको झाला होता.जागावाटपावरून दोघांमध्ये बिनसले व ते स्वतंत्रपणे लढले,पण दोघेही तोंडावर आपटले.एकत्र आलो नाही तर हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाईल,अशा भितीमुळे हे दोघे पुन्हा एकत्र आले व त्यांनी सरकार बनवले.या पाच वर्षात या दोघांमध्ये निर्माण झालेली दरी कमी होण्याऐवजी सतत वाढत गेली.सेनेला सतत दुय्यम वागणूक मिळत असतानाही उद्धव ठाकरे यांनी संयम राखून एकत्रित संसार चालू ठेवला.कारण आपण बाहेर पडलो तर भाजप,राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवेल व ते आपल्याला महागात पडेल,हे त्यांनी जाणले होते.त्यामुळे त्यांनी पाच वर्षे ” तोंड बांधून बुक्क्यांचा मार,” सहन केला.
२०१९ च्या निवडणुकीतही जागावाटपावरून तीव्र स्वरूपाचे मतभेद निर्माण झाले,पण अमित शहा यांच्या मध्यस्थीने ते मिटवण्यात आले.या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरून तीस वर्षे अबाधित राहिलेली युती तुटली.उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग केला व देवेंद्र फडणवीस यांना धोबीपछाड दिला. ” मी परत येईन,मी परत येईन,” अशी डरकाळी विधानसभेत फोडणाऱ्या फडणवीस यांना ठाकरे-पवार दुकलीने विरोधी पक्षाच्या बाकावर बसायला भाग पाडले.
अशा या हिंदुत्ववादी पक्षाने आजही हिंदुत्व सोडलेले नाही,पण आपल्या सोबत धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेऊन सरकार मी बनवू शकतो,हे दाखवून दिले.पण अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना गळाला लावून शिवसेना फोडली.सुमारे ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्विकारले व उद्धव ठाकरे यांचे सरकार गडगडले.पक्षाचे आमदार पळवले,पक्ष व चिन्ह चोरले,पण अशा अस्मानी संकटाने ते डगमगले नाहीत.त्यांनी भाजप व शिंदे यांच्याविरोधात रान उठवले.ते व त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे तमाम जिल्हे अक्षरशः पिंजून काढले.त्यांना शरद पवार या सारख्या दिग्गज नेत्याने मोलाची साथ दिली.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या दोघांनी भाजपला कात्रजचा घाट दाखवला.पण विधानसभा मात्र त्यांना जिंकता आली नाही.या निवडणुकीत शिवसेना,राष्ट्रवादी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,या पक्षाची अक्षरशः धुळदाण झाली.
भाजपला रोखण्यासाठी ज्या इंडिया आघाडीची स्थापना झाली आहे,त्या आघाडीत उद्धव ठाकरे यांनी असे वेगळे स्थान निर्माण केले होते.पण विधानसभेतील पराभवाने त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला.आज दिवसागणिक त्यांचे सहकारी त्यांना सोडून पळत सुटले आहेत.या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आज वर्धापनदिन साजरा होत आहे.हे सारे रामायण घडत असताना उद्धव ठाकरे जाणाऱ्यांना रोखत नाहीत.कारण ही प्रक्रिया एकदाची खंडित झाली की विश्वासू सहकाऱ्याच्या साथीने पक्षाला पुन्हा उभारी देण्याचा त्यांचा मानस असावा बहुतेक…

