दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
“अपरिपक्वता,”
कोण कोणाचा बाप ? यावरून मंत्रिमंडळ बैठकीत जोरदार खडा्जंगी,
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची काल मुंबईत बैठक झाली.आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ” कोण कोणाचा बाप,” यावर तमाशाचा फंड चांगलाच रंगला होता.
भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी नुकतेच केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर नाव न घेता टीका केली होती. ” सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला आहे,” असे नितेश राणे आपल्या भाषणात म्हणाले होते.नितेश राणे यांचे हे वक्तव्य शिवसेना मंत्र्यांच्या जिव्हारी लागले.त्यामुळे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचे जोरदार पडसाद उमटले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांकडे याविषयी तक्रार केली,त्यामुळे बैठकीतील वातावरण तापले.
शिवसेनेच्या मंत्र्यांनीही “आमचा बाप बाळासाहेब ठाकरे,तुमचा कोण ? ” असा प्रति प्रश्न उपस्थित करत भाजपवर पलटवार केला.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. अशाप्रकारचे बोलणे टाळले पाहिजे,असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना दिला.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते ?
धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी घटक पक्षांना गर्भित इशारा दिला.कुणी कितीही ताकद दाखवली,कसंही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय,हे लक्षात ठेवा,असा दमच नितेश राणेंनी दिला होता.सगळ्यांचा बाप म्हणून देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा,असेही नितेश राणे म्हणाले होते.देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असले तरी धाराशिवच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाहीत म्हणूनच,जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती मिळाल्याचं नितेश राणेंनी म्हटलं होतं.
भाजप आणि शिवसेनेत जिल्हा नियोजन समिती निधीवरून सुप्त संघर्ष सुरू आहे.त्यानंतर
राणे बंधूंमध्येही हा पक्षीय संघर्ष पेटला तो धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आल्यामुळे.शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत.भाजपच्या राणा जगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर प्रताप सरनाईकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आली.धाराशिवमध्ये सध्या भाजप आणि शिवसेनेत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून सुप्त संघर्ष सुरू आहे.त्यावरून नितेश राणेंनी शिवसेनेला उद्देशून बोचरी टीका केली होती.यापूर्वीही नितेश राणे यांनी अशाच प्रकारची जहाल वक्तव्ये केल्यामुळे अजित पवार व अन्य मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती.नितेश राणे,हे समाजा समाजात तेढ निर्माण होईल,अशाप्रकारची वक्तव्ये करत असल्यामुळे राज्यातील वातावरण गढूळ होत चालले आहे,असे शिवसेनेच्या मंत्र्यांचे म्हणणे आहे.आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेनेच्या मंत्र्यांचा संताप पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिस्थितीचे भान राखत नितेश राणे यांना खडे बोल सुनावले.
नितेश राणे वारंवार अशाप्रकारची बेताल वक्तव्ये करत असल्यामुळे भाजप व घटक पक्षांचे मंत्री अस्वस्थ झाले आहेत.

