दीपक मोहिते,
मुंब्रा रेल्वे दुर्घटना ; तमाम रेल्वे प्रवासी संघटनानी एकत्र आले पाहिजे,
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेत ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेनंतर मुंबईच्या जीवघेणा रेल्वेप्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.आपले मायबाप सरकार नेहमीप्रमाणे मृतांच्या वारसाना नुकसानभरपाई देऊन मोकळे झाले आहे.पण पुढे काय ? तर ” ये रे माझ्या मागल्या, ”
हे असे गेल्या काही वर्षांपासून सतत सुरू आहे.लोक किड्यामुंग्यासारखे मरत असताना,सरकार मात्र मेट्रो, मोनोरेल व टनेल बांधण्यात व्यस्त आहे.अशा दुर्घटना घडल्या की अवघ्या पाच मिनिटात सरकार आर्थिक मदत देऊन मोकळी होत असते.पण सरकार गाड्या वाढवणे,प्रवाश्यांना आधुनिक सुविधा देणे,इ.कामाकडे कधीच लक्ष देत नाही.मुंबईचा रेल्वे प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे.शहरांची लोकसंख्या सतत वाढत आहे, त्याप्रमाणात गाड्या वाढल्या नाहीत.दररोज लाखो प्रवासी आपला जीव धोक्यात घालुन प्रवास करत असतात.दररोज होणाऱ्या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या प्रवाशांची सतत वाढत आहे, पण त्यावर उपाययोजना करण्यात सरकार हलगर्जीपणा करत आहे.इतर पक्षाचे राजकीय नेतेदेखील दुर्घटना घडली की वृत्तवाहीन्याना केवळ मुलाखती देण्यात धन्यता मानतात.रेल्वे प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारावर अंकुश आणण्यासाठी तमाम रेल्वे प्रवासी संघटनानी एकत्र येऊन रेल्वे प्रवाशांची परिषद आयोजित करावी व या परिषदेत रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे.तरच हे मुर्दाड अधिकारी व राजकीय नेते वठणीवर येऊ शकतील, अन्यथा आपले जीव असेच जात राहतील.

