दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
दोघे एकमेकांना कधी मिठी मारणार ? राज्यात सर्वत्र संभ्रमावस्था…
सेनेचे मुखपत्र असलेले ” सामना,” दैनिकात उद्धव व राज,या दोघांची बातमी आज छायाचित्रासह प्रसिद्ध झाल्यामुळे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत मिळाले आहेत.प्रकरणी हे दोघे एकमेकांना कधी टाळी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे दोघे जर आजच्या घडीला एकत्र आले तरी त्यांची ही गळाभेट किती काळ टिकेल ? याविषयी साशंकताच अधिक आहे.” आमच्या देवाला बडव्यांनी घेरले आहे,यापासून सुरू झालेल्या गृहकलहाचा प्रवास बाळासाहेबांना ” चिकन सुप आणून देण्या,” पर्यंत येऊन ठेपला आहे.पण कालांतराने भाजपच्या झंझावातापुढे या दोघांचा सुपडा साफ झाला. त्यामुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आपलं काही खरं नाही,अशा निर्णयाप्रत आल्यानंतर या दोघांना अशी उपरती झाली आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत उद्धव ठाकरे यांनी साथसंगत करत महाविकास आघाडी सरकारचा यशस्वी प्रयोग केल्यामुळे भाजप व त्यांच्या मित्रपक्षाने उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले,अशी ओरड राज्यभरात सुरू केली.त्याचे परिणाम उद्धव यांना भोगावे लागले.त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ पन्नास जागा जिंकता आल्या.तर महायुतीने २३० चा पल्ला गाठला.पण या साऱ्या धामधूमीत राज ठाकरे यांच्या पक्षाचा पार धुव्वा उडाला.या सर्व घडामोडीनंतर राज यांनी एका मुलाखतीमध्ये ” आम्ही दोघे भाऊ राज्याच्या हीतासाठी कधीही एकत्र येऊ शकतो,” असे वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी क्षणाचा विलंब न लावता राज यांना लगबगीने टाळी दिली.या घटनेमुळे राज्याचे राजकारण बऱ्यापैकी तापले.नाक्यानाक्यावर चर्चेला उधाण आले,दैनिकाचे रकानेच्या रकाने या विषयावर भरू लागले,वृत्तवाहिनीचे कॅमेरे पापाराझीच्या आवेशात उद्धव व राज यांच्या गाड्याच्या मागे धावू लागले.परंतु या सर्व घडामोडीनंतरही दोघांनी एकमेकांच्या थेट भेटी घेणे टाळले.
पण हे सारे महाभारत घडत असताना दुसरीकडे या दोघांची मुले मात्र मानापमान नाट्य रंगवतण्यात धन्यता मानत आहेत.कोणी कोणाला फोन करायचा,यावरून राज यांचे बोलघेवडे पदाधिकारी सध्या पोपटपंची करताना पाहायला मिळत आहेत.या दोघांची युती होण्यासंदर्भात अद्याप सिग्नल मिळत नसल्यामुळे दोघांचे पदाधिकारी व कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत.

