दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राजकारणाच्या जीवघेण्या खेळात,पालघरवासियांची अवस्था,” सहन होत नाही आणि सांगताही येत नाही,”
पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे दौरे,जनता दरबार, आढावा बैठकी व गावांना भेटी,अशा वारंवार होणाऱ्या गैरलागू उपक्रमामुळे पालघर जिल्ह्याचे प्रशासकीय कामकाज विस्कळीत होत आहॆ.जिल्हा परिषद,जिल्हाधिकारी,प्रांत कार्यालय,तहसीलदार व पंचायत समित्या, नगरपरिषदा,नगरपंचायत व ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन व उपक्रम राबवण्यात शक्ती व प्रचंड सार्वजनिक पैसा खर्ची पडत आहॆ.
त्यामुळे प्रशासकीय कामकाजही दिवसेंदिवस विस्कळीत होत चालले आहॆ.या सर्व कार्यालयाचे तमाम अधिकारी व कर्मचारीवर्गाला दप्तर घेऊन पालकमंत्र्यांच्या मागे धावे लागत आहॆ.मात्र लोकांची कामे मात्र मार्गी लागत नाहीत.त्यामुळे पालकमंत्र्यांनी हा तमाशा बंद करावा,अशी मागणी करण्यात येत आहॆ.
लोकांची कामे मार्गी लावण्याऐवजी पालकमंत्री पक्षवाढीसाठी असे उपदव्याप करत असल्याची भावना जिल्ह्यात वाढीला लागली आहॆ.पालकमंत्र्याच्या असे उपक्रम व कार्यक्रमामधून लोकांची किती कामे होत असतात,हा एक संशोधनाचा विषय आहॆ.त्यांच्या अशा वागण्यामुळे पालकमंत्री हा जिल्ह्याच्या विकास कामासाठी नेमण्यात आला आहॆ की पक्षवाढीसाठी ? अशी चर्चा सर्वत्र होत आहॆ.गेल्या सहा महिन्यात पालकमंत्र्यांच्या दौरे व उपक्रमावर किती वेळ व सार्वजनिक पैश्याची उधळपट्टी झाली,याविषयीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर करावी व हे उपदव्याप त्वरित रोखण्यात यावेत,अशी मागणी पालघरवासि्यांनी केली आहॆ.
पालघर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकेकाळी चांगले वर्चस्व होते.पण गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्या गटाला मुख्यमंत्री फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण या त्रिकुटांनी लोकसभा व विधानसभेच्या सहा जागापैकी चार जागा स्वतःकडे ठेवून शिंदे गटांची चांगलीच गळचेपी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक असलेल्या गणेश नाईक यांना पालकमंत्रीपद देऊन शिंदे यांचा गळा आवळला.गेली सात ते आठ वर्षात नाईक यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना पुन्हा जीवदान दिले.त्यांच्या या उपकाराची उतराई होण्यासाठी गणेश नाईक यांनी स्वतःला दिवसरात्र झोकून दिले आहॆ. सध्या त्यांचा पालघर जिल्ह्यात वावर वाढला आहॆ.त्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रचंड दमछाक तर होतेच,पण सार्वजनिक पैश्याचीही प्रचंड उधळपट्टी होत आहे. राजकारणाच्या या अशा जीवघेण्या खेळात पालघरवासीयांची अवस्था ” सहन होत नाही आणि सांगताही येत नाही,” अशीच झाली आहे.

