दीपक मोहिते,
जागतिक पर्यावरण दिन विशेष,
पर्यावरणाचे बिघडते संतुलन ; मानवाची वाटचाल विनाशाकडे,
आज जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येत आहे.पर्यावरणाचे महत्व व भविष्यातील संकटे,यावर सतत विचारमंथन होणे,गरजेचे आहे.आपण सारे दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो व त्यानंतर मात्र ” ये रे माझ्या मागल्या,” असेच होत असते.यावरून असे स्पष्ट की आपल्याला केवळ ५ जून एकमेव दिवसाचे महत्व असते.या दिनी पर्यावरण विषयक कार्यक्रम व उपक्रमाची अक्षरशः रेलचेल असते.उर्वरित ३६४ दिवस आपण व आपले राज्यकर्ते या ज्वलंत विषयाकडे ढुंकूनही बघत नाहीत.त्यामुळे आपल्या देशाच्या पर्यावरणाचे संतुलन पार विस्कळीत झाले आहे.अवकाळी पाऊस,अवेळी पाऊस पडणे,दुष्काळ,अधूनमधून ओला दुष्काळ,अशा घटना आपल्या पाचवीला पूजल्या आहेत.
पर्यावरण व मानवी
जीवन,याचा एकमेकांशी निकटचा संबंध आहे.परंतु गेल्या काही वर्षांत मानवजात,या पर्यावरणाच्या जीवावर उठला आहे.मानवाच्या या कृतीचे बारकाईने अवलोकन केल्यास,माणूस हा पर्यावरणाच्या नाही,तर तो स्वतःच्याच जिवावर उठल्याचे दिसून येते.कारण पर्यावरणाचा सतत होणारा ऱ्हास,हा आता मानवी जीवनावर परिणाम करू लागला आहे.त्यामुळे जगभरातील अनेक देश आता खडबडून जागे झाले आहेत.पर्यावरणाचे संतुलन सतत खालावत चालल्याचा परिणाम आता मानवाला मोठ्या प्रमाणात भोगावे लागत आहेत.भविष्यात या संकटातून आपली सुटका होईल,असे वाटत नाही.

हवामानात वारंवार होणारे बदल,वाढते तापमान,सतत आदळणारी वादळे व अधून मधून होणारा त्सुनामीचा कोप इ.कारणे,भविष्यात जगाला संकटाच्या खाईत ढकलण्यास पुरेशी आहेत.या सर्व धोक्याची जाणीव जगभरातील मानवजातीला होऊ लागली आहे.त्यामुळे ” पर्यावरण वाचवा,” यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.हवेतील प्रदूषण,वृक्षतोड,समुद्रातील प्रदूषण व प्रदूषणकारी प्रकल्पावर बंदी,अशा उपाययोजना करण्याच्या कामी जगातील सारे देश आता एकवटले आहेत.ही बाब समाधानकारक असून यातून चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतील,अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
जगातील पर्यावरणाचा यापुढे ऱ्हास होऊ नये,यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने १९७४ पासून ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.दरवर्षी एक थीम ठरवून सर्व देशाची सरकारे,उद्योग व पर्यावरणवादी संस्था प्रयत्न करत असतात.मात्र गेल्या ५० वर्षात अपेक्षित उद्दिष्ट साध्य झाले नसले तरी लोकांमध्ये जनजागृती झाली,हे देखील तितकेच महत्वाचे आहे.आपल्या देशाचे
पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा काही वर्षांपूर्वी निधन झाले.या अवलियाने आपली सारी हयात ” झाडा आधी आम्हाला कापा,” असे सांगत झाडांना मिठ्या मारल्या. अशाप्रकारे त्यांनी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी लाखो झाडे वाचवली.त्यामुळे उत्तर भारतात काही प्रमाणात जंगले वाचू शकली.त्यांचे हे आंदोलन ” चिपको,” या नावाने नावारूपाला आले.कारण वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल व भविष्यात येऊ घातलेले संकट,त्यांच्या लक्षात आले होते.त्यांच्या या आंदोलनाला ग्रामीण भागातील जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
आज जगभरात दर पाच सेकंदानी,खेळायचे मैदान इतके जंगल नष्ट होतंय.जगात एकूण प्रवाळापैकी ५० टक्के प्रवाळ नष्ट झाले आहे,तर येत्या २५ वर्षात हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत पोहोचेल,असा अंदाज पर्यावरण विषयी अभ्यास करणाऱ्या जगातील अनेक संस्थांनी व्यक्त केला आहे.पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी हवाप्रदूषण,जलप्रदूषण व भूमीप्रदूषण,यावर नियंत्रण आणणे व प्रभावी उपाययोजना करणे,ऊर्जा संसाधनाचा अतिवापर टाळणे,शाश्वत विकासासाठी पर्यावरण व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे,शैक्षणिक स्तरावर पर्यावरण शिक्षण व प्रशिक्षण देणे,असा कार्यक्रम प्रत्येक देशाने राबवला तर पर्यावरण विस्कळीत होण्याचा वेग फार नाही,पण थोडा फार कमी होऊ शकतो,असे पर्यावरण तज्ञाचे म्हणणे आहे.पर्यावरणाची हानी रोखत योग्य संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करणे,हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.पण दुर्देवाने आपल्या देशात ते पार पाडले जात नाही.

