दीपक मोहिते,
” निवडणूक रणसंग्राम,”
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ; जागा कमी व इच्छुकांची भाऊगर्दी,
जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणूका या कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखल्या जातात.त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्त्यांची संख्या मोठी असते.लहानातला लहान कार्यकर्ता हा देखील या निवडणुकीत इच्छुक असतो.राज्यात गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाना न्यायालयाच्या आदेशामुळे आता लवकरच मुहूर्त लागणार आहे.त्यामुळे या निवडणुकीची तयारी करीत असलेल्या कार्यकर्त्यामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे.दुसरीकडे महायुतीमधील तीन घटक पक्ष आगामी काळात होत असलेली ही निवडणूक युती करून लढवणार की स्वबळावर लढणार,यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.द
दरम्यान मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी महायुती एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.जागा कमी व तीनही पक्षातील इच्छुकांची गर्दी लक्षात घेता जागावाटपाच्या वेळी ” तू तू मै मै,” होण्याची शक्यता आहॆ. त्यासाठी फडणवीस यांनी ” मैत्रीपूर्ण लढती,”असा नवीन फंडा अंमलात आणण्याचे ठरवले आहॆ.त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे.तर काही ठिकाणी महायुती झाली नाही तर निवडणुकांनंतर युती करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहॆ.तीन पक्षांना जागावाटप करणे, हे एक आव्हान असुन त्याला सामोरे जाताना महायुतीतील तिन्ही घटक पक्षाना तारेवरची कसरत करावी लागणार आहॆ.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राज्याच्या राजकीय पटलावर मोठ्या हालचाली सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.महायुतीमधील भाजप,शिवसेना ( शिंदे गट ) राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) या तीनही पक्षाचे कार्यकर्ते सध्या कामाला लागले आहेत.महायुतीमधून उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांना मात्र कसरत करावी लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर होणाऱ्या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील शिवसेना,राष्ट्रवादी आणि भाजपसह घटक पक्ष एकत्र लढणार असल्याचे ठरले असले तरी एकूण जागांची संख्या व इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षात घेता जागावाटपाच्या वेळी पक्षाच्या नेत्यांची प्रचंड दमछाक होणार आहॆ.तसेच उमेदवारी न मिळाल्यामुळे मोठ्याप्रमाणात बंडखोरी होण्याची भिती त्यांना सतावत आहॆ.
मुंबईलगत असलेल्या पालघर व ठाणे,या दोन्ही जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाचे बऱ्यापैकी वर्चस्व आहॆ.या दोन्ही जिल्ह्यात अजित पवार गटाचे अस्तित्व नगण्य असल्यामुळे,अजित पवार गट ठाणे जिल्ह्यातील शहापूर,मुरबाड या तालुक्यातील सहा ते सात जागा लढवण्याची शक्यता आहॆ.पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) पक्षाची साधी कार्यकारिणी गठीत होऊ शकली नाही.त्यामुळे या जिल्ह्यात ते निवडणुकीपासून दूर राहतील,असा अंदाज आहॆ.शरद पवार यांच्या गटाचीही अशीच काहीशी परिस्थिती आहॆ.या दोन्ही जिल्ह्याच्या निवडणुकीत महायुती ( भाजप व शिवसेना ) व शिवसेना ( उबाठा ) अशीच लढत होण्याची शक्यता आहॆ.

