दीपक मोहिते,
पाहणी दौऱ्याचे इव्हेंट व सोहळे झाले उदंड ; पण विकासकामे मात्र जाग्यावरच…..
वसई व नालासोपारा मतदारसंघात गेल्या सहा महिन्यात असंख्य इव्हेंट पार पडले.या सर्व इन्व्हेंटस सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाशी किती निगडित आहे,हा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो.नवीन आमदारांची निवड,त्यांचे सत्कार सोहळे,अर्धवट अवस्थेत असलेल्या विकासकामांची केवळ पाहणी करणे,( अद्याप विस्कळीत असलेला पाणीपुरवठा,पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल व ४१ इमारतीमधील ४०० कुटुंबाचे पुनर्वसन,या व्यतिरिक्त अनेक विकासकामे आजही अर्धवट अवस्थेतच आहेत.) अशी विकासकामे अद्याप अर्धवट अवस्थेत पडून आहेत.पण सोहळ्यांचे इव्हेंटसना अक्षरशः उत आला आहे.
तत्कालीन माजी आमदारांनी मंजूर केलेल्या विकसकामाचे श्रेय घेण्यासाठी सुरू असलेली धडपड,पाहता येणाऱ्या साडेचार वर्षात आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे,याविषयी वसईकर जनता चिंतेत सापडली आहे.नालेसफाई केवळ कागदावरच पाहायला मिळते.पण कार्यकर्ते व मनपा अधिकाऱ्यांसोबत नाल्यावर उभे राहून सेल्फी काढून त्याची क्लिप व्हायरल करणे,इ.कामांना मात्र वेग आला आहे.ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे.वास्तविक या आमदारांनी सार्व.आरोग्य,पाणी,शिक्षण,
रस्तेदुरुस्ती,पदपथ फेरीवाल्यापासून मुक्त करणे व महानगरपालिका कामकाजात पारदर्शकता आणणे,अशा कामाना प्राधान्य देणे आवश्यक आहे.पण तुमच्या आमच्या नशिबी केवळ इव्हेंट व सोहळे आले आहेत.महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या प्रवासीभाड्यात महिलांना ५० % सवलत देणे,ही योजना माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी मंजूर करून घेतली होती.पण त्या योजनेचे श्रेय उपटण्याचे काम सध्या भाजपचे आमदार करत आहेत.बसच्या कंडक्टरकडून तिकीट घेणे व त्याची प्रत दाखवताना व्हिडियो काढून ती व्हायरल करणे,अशा कामात भाजपचा हात कोणी पकडू शकत नाही.पण दुर्देवाने असे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत.उड्डाणपूल व जलवाहिन्या अंथरण्यांच्या कामावर पाहणी करत असल्याचे इव्हेंट तूर्तास थांबले आहेत,आता महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी हा नवीन इव्हेंट आता पाहायला मिळत आहे.या सर्व धामधुमीत नालासोपारा येथे विस्थापित झालेल्या कुटुंबाच्या आक्रोशाकडे पाहायला आमच्या लोकप्रतिनिधीकडे सवड नाही.

