दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
पराभवानंतर बविआत आलेली मरगळ व अस्वस्थता,पक्षाला हानिकारक ठरू शकतात,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सध्या राजकीय पक्षांच्या हालचालींना सुरुवात झाली आहे.सर्वसाधारणपणे या निवडणुका ऑक्टो.होतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.त्यादृष्टीने काही राजकीय पक्ष कामाला देखील लागले आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगाने १२० दिवसात ( चार महिने ) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिल्यानंतर आयोगाचे अधिकारी आता कामाला लागले आहेत.काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईला भेट देऊन निवडणूक कामाचा आढावा घेतला होता.या सर्व पार्श्वभूमीवर या निवडणुका समीप आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या सर्व धामधुमीत राजकीय पक्ष देखील ” मुंबई कोणाची,” या एकमेव विषयावर आता आपले लक्ष केंद्रित करू पाहत आहेत.मुंबई,ठाणे,वसई – विरार,कल्याण -डोंबिवली,उल्हासनगर,
कुळगाव – बदलापूर,या महानगरपालिका जिंकण्यासाठी सारे राजकीय पक्ष या निवडणुकीत जीवाचे रान करतील, अशी शक्यता आहॆ.मुंबई,ठाणेसह वसई – विरार या महानगरपालिकेची निवडणुकही रोमहर्षक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मुंबई व ठाणे,या दोन महत्वाच्या महानगरपालिका शिवसेनेच्या ( उबाठा ) जाऊ नये,यासाठी भाजप या निवडणुकीत जीवाचे रान करेल.तर वसई – विरार महानगरपालिकेवर पुन्हा माजी आ.हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व निर्माण होऊ नये,यासाठी भाजप या निवडणुकीत साम,दाम,दंड व भेद,या नितीचा पुरेपूर वापर करेल,अशी शक्यता आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे तीनही उमेदवार पराभूत झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहॆ.दिवाळीच्या सुमारास होणाऱ्या या निवडणुकीची सारी सूत्रे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे असून त्यांच्या दिमतीला सध्या पालकमंत्री गणेश नाईक आहेत.वसई – विरारसह पालघर जिल्ह्यात भाजप,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व दोन्ही शिवसेना यांच्याकडे चेहरा नसल्यामुळे या निवडणुकीची धुरा बाहेरच्या नेत्याकडे असेल या तालुक्यात आगरी,मांगेला,ख्रिस्ती, मुस्लिम,गुजराती व मराठी अशी समाजरचना आहॆ.त्यापैकी
आगरी समाज हा कायम पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत राहिला असुन जूचंद्र,अर्नाळा,विरार,नालासोपारा पूर्व,मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेली अनेक गावे,ही आगरीबहुल म्हणून ओळखली जातात.गेल्या विधानसभा निवडणुकीत या समाजाने भाजपला साथ दिली.तसेच तालुक्यात बहुसंख्येने असलेले उत्तर भारतीय,गुजराती व मारवाडी समाज देखील बहुजन विकास आघाडीपासून सध्या दुरावला आहॆ.गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना आपल्याकडे वळवण्यात भाजप यशस्वी झाला आहे.गेल्या निवडणुकीत या सर्व समाजाने भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली.आगरी,उत्तर भारतीय,गुजराती व मारवाडी व मुस्लिम समाज,गेली तीन दशके माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी सोबत होते.या चारही समाजाने विधानसभा निवडणुकीत केलेले ” घुमजाव,” हे राजकीय विश्लेषकांना बुचकळ्यात टाकणारे होते.तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई,
महानगरपालिकेतील अमर्याद भ्रष्टाचार,वैद्यकीय सेवेचा उडालेला बोजवारा, ( तालुक्यात मनपाकडून सरकारी रुग्णालय व स्वतःच्या शाळा न उभारणे व आरोग्य सेवेतील अनागोंदी कारभार, ) आदी कारणामुळे वर्षानुवर्षे साथ देणारा मतदार आता बहुजन विकास आघाडीपासून दुरावला आहॆ.त्यामुळे
दुरावलेला हा मतदार पुन्हा आपल्याकडे वळवण्याचे फार मोठे आव्हान,बहुजन विकास आघाडीसमोर उभे ठाकले आहे.या समाजाला पुन्हा आपलेसे करण्यासाठी पक्षाने गेल्या सहा महिन्यात कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. निवडणुका दारावर आल्या असतानाही या पक्षात सध्या कोणत्याही हालचाली होत असल्याचे पाहायला मिळत नाही.पक्षात सध्या निर्माण झालेली ही मरगळ व अस्वस्थता,या निवडणुकीत पक्षाला हानिकारक ठरू शकतात.

