दिपक मोहिते,
” विश्लेषण, ”
वसई विरार जिल्हाध्यक्षपदी महिलेची वर्णी लावून भाजपने वेगळे संकेत दिले आहेत,
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या नेतृत्वात नुकतेच मोठे बदल केले आहेत.हे बदल करताना प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती,नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा,पक्षाप्रती असलेली निष्ठा,इ.निकष लावण्यात आले आहेत.जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांचा सोपस्कार पार पडल्यानंतर लवकरच जिल्हा कार्यकारिणीमधील सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.या सर्व घडामोडीमुळे महानगरपालिका,
जिल्हा परिषदा,नगरपंचायती व पंचायत समित्या जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसल्याचे स्पष्ट होत आहे.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.त्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्ष कार्यकारिणीमध्ये आता महत्वाचे बदल केले आहेत.
भाजपची आयडीओलॉजी अनेकांना मान्य नसली तरी हा पक्ष केडरबेस पक्ष आहे,हे विरोधक देखील मान्य करतात.पण सत्तेत येण्यापूर्वी भाजपमध्ये महिलांना महत्वाच्या पदावर फारशी संधी मिळत नव्हती.विजयाराजे सिंदिया, सुषमा स्वराज व अन्य काही महिलांचा अपवाद वगळता अनेक महिला पक्षात कायम उपेक्षित राहिल्या.
त्यानंतरच्या दहा वर्षाच्या काळात महिलांचा भाजपकडे ओघ सुरू झाला.गेल्या काही वर्षात झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपने जी यशस्वी वाटचाल केली,त्याची नोंद जगाने घेतली.चीननंतर सर्वात मोठी सदस्यसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून तो नावारूपाला आला.गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला फटका बसल्यानंतर पक्षबांधणी व प्रचाराच्या स्ट्रॅटेजीमध्ये भाजपने महत्वाचे बदल केले.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याचे दृश्यपरिणाम पाहायला मिळाले.लाडकी बहीण योजना सुरू करून त्यांनी लाखो महिलांना आपल्या पक्षाकडे वळवण्यात यश मिळवले.
पालघर जिल्ह्यात त्यांनी पक्षात केलेले बदल,हे देखील अत्यंत विचारपूर्वक केले आहेत.पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण अध्यक्षपदी भरत राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली होती.मात्र त्यांच्या निवडीला काही कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे त्यांच्या नियुक्तीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.मात्र गेल्या दहा वर्षात झालेल्या निवडणुकामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने घेतलेली भरारी लक्षात घेऊन दिलेली स्थगिती उठवण्यात आली व ते पुन्हा जिल्हाध्यक्षपदी विराजमान झाले.
वसई – विरार भागात लोकसभा निवडणूकीत पक्षाला मिळालेले अभूतपूर्व यश लक्षात घेऊन जिल्हाध्यक्षपद महिलेकडे सोपवण्यात येईल,असा अंदाज होता,तो प्रज्ञा पाटील यांच्या नियुक्तीमुळे खरा ठरला आहॆ.विधानसभा निवडणूक काळात हॉटेल
विवांता हॉटेलमध्ये जे काही घडले,त्या विरोधात उभ्या ठाकणाऱ्या प्रज्ञा पाटील यांची वर्णी लावून भाजपने दोन गोष्टी साध्य केल्या आहेत. पक्षात कार्यक्षम महिलांचा सन्मान व पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पक्षकार्य करणाऱ्या महिलांना समान संधी,त्यामुळे येणाऱ्या काळात पक्षात अनेक महिला विविध पदावर पहायला मिळतील.दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी दिग्गज नेत्यांना डावलून पक्षाने एका महिलेची वर्णी लावली.या सर्व घडामोडीमुळे समस्त महिलावर्गात भाजपविषयी आता वेगळे संकेत गेले आहेत.

