दीपक मोहिते,
” नको असला विकास,”
प्रस्तावित पुरंदर विमानतळ : पोलीसांच्या लाठीहल्ल्यात महिलेचा मृत्यू,
” देशाचा सर्वांगीण विकास,” या तीन गोंडस शब्दाविषयी ग्रामीण भागातील लोकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे.वाढवण,बुलेट,समृद्धी मार्ग,द्रुतगती मार्ग,रेल्वेचा डेडिकेटेड फ्रेट प्रकल्प व आता बारामती जिल्ह्यातील पुरंदर येथे होणारऱ्या प्रस्तावित विमानतळासाठी बळजबरीने होत असलेले जमिनीचे संपादन लक्षात घेता हा अशाप्रकारचा सर्वांगीण विकास आम्हाला नको,असे स्थानिक भूमिपुत्राचे म्हणणे आहे.

दोन दिवसांपूर्वी पुरंदर विमानतळासाठी जमीन संपादन प्रक्रियेच्या विरोधात सात गावातील स्थानिक भूमीपुत्रांनी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले.सरकारच्या आडमुठे धोरणामुळे हे आंदोलन चिघळले.पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्यामुळे शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पोलिसांनी लोकांवर जोरदार लाठीहल्ला सुरू केला.या लाठीहल्ल्यात अंजना महादेव कामठे ( रा. कुंभारवळण,पुरंदर,) या महिलेचा मृत्यू झाला.या घटनेमुळे स्थानिक भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट उसळली.त्यानंतर पोलीस व ग्रामस्थ यांच्यामध्ये अक्षरशः धुमश्चक्री झाली.आम्हाला विश्वासात न घेता सरकारने जमीन संपादन प्रक्रिया राबवल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप अनेक ग्रामस्थांनी केला आहे. सरकारने याप्रकरणी संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याची गरज होती,पण सरकारने पोलीस बळावर दडपशाहीचे धोरण राबवले. स्थानिक भूमिपुत्राच्या म्हणण्यानुसार ही केवळ जमिनीची नव्हे तर आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ती आम्ही शेवटपर्यंत लढू. आमचा जीव गेला तरी चालेल,पण आता माघार घेणार नाही,असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.सरकारने बळजबरीने आमच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न केल्यास सरकारला ते कदापि शक्य होणार नाही, असे ज्येष्ठ शेतकऱ्यांनी माध्यमाना सांगितले.

