दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
वसई/विरारच्या नागरिकांनी यंदाही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी..
पावसाळा तोंडावर आला असून वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांना अद्याप वेग आलेला नाही.” ” नेमेची येतो पावसाळा,” या म्हणीप्रमाणे करदात्यांना यंदाही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागणार आहे.दर पावसाळ्यात वसई/ विरार भागात अनेक परिसर जलमय होत असतात.दरवर्षी नालेसफाईच्या कामावर कोट्यवधी रु.खर्च होत असतात.पण मनपा अधिकारी,ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांच्या मिलीभगतमुळे दरवर्षी नागरिकांना किमान तीन ते चार दिवस हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.

वसई विरार उपप्रदेशात अतिवृष्टी झाली की उपप्रदेशात सर्वत्र हाहाकार उडतो.या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते.नालासोपारा शहराच्या पूर्व भागात तुळींज,या गजबजलेल्या वस्तीच्या परिसरात दरवर्षी दैनंदिन व्यवहार तीन ते चार दिवज ठप्प होत असतात.निवासी घरात पाणी घुसून नागरिकांचे संसार उघड्यावर पडतात,तर व्यापाऱ्यांच्या दुकानातील सामानाचे अतोनात नुकसान होते.दरवर्षी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या मागची कारणे काय आहेत,याचा मागोवा घेण्यासाठी पाच वर्षांपूर्वी मनपा प्रशासनाने आयआयटी व निरी,या दोन संस्थाना कोट्यवधी रु.दिले. या दोन्ही संस्थांनी सर्वेक्षण करून आपला अहवाल दिला.पण मनपाच्या मुर्दाड अधिकाऱ्यांनी हा अहवाल सार्वजनिक न करता दडपून टाकला.त्यामुळे या परिस्थितीला कारणीभूत असलेली कारणे लोकांना कळू शकली नाहीत.पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यात तसेच नाल्याच्या आजूबाजूला अनधिकृत बांधकामे झाल्यामुळे नाले अरुंद होत गेले व दर पावसाळ्यात वसई तालुका जलमय होत असतो.रेल्वे व मनपा,या दोघांमध्ये नसलेला समन्वय,नालेसफाईच्या कामातील गैरव्यवहार,शहरातील पावसाळी पाणी वाहून नेणारे नाले बुजवण्यात आल्यामुळे लालखाडीमार्गे समुद्राला जाणारे पाणी अडून राहते,त्यामुळे नागरिकांना दरवर्षी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.महानगरपालिका हद्दीतील चार शहरात बांधण्यात आलेली गटारे देखील अत्यंत चुकीच्या तसेच नियोजनशून्य पद्धतीने बांधण्यात आली.हेही एक महत्वाचे कारण या नैसर्गिक आपत्तीमागे आहे.यंदाही नालेसफाईची कामे केवळ ३० ते ३५ % च झाली आहेत.त्यामुळे करदात्यांनी नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याची तयारी ठेवायला हवी.

