दीपक मोहिते,
सरकारचे बनावट प्रगती पुस्तक,
काही दिवसापूर्वी हिंगोलीचे आ.संजय गायकवाड यांनी राज्य पोलिसांवर बेछूट आरोप केले होते.राज्याचे पोलीस भ्रष्ट असुन ५० लाख रु.पकडले तर पोलीस ५० हजार रु.च दाखवतात,असे ते म्हणाले होते.त्यांचा हा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागला होता. कारण गृहखाते त्यांच्याकडे आहे.त्यामुळे त्यांचा राग अनावर होणे, साहजिकच होते.त्यांनी त्वरित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गायकवाड विरोधात तक्रार केली व त्यांना योग्य ती समज द्या,असे सुनावले.त्यानंतर शिंदे यांनी आ.गायकवाड यांचे कान उपटले.या सर्व घडामोडीनंतर आ.गायकवाड यांनी सारवासारव करत या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली.वास्तविक आ. गायकवाड यांनी जे वास्तव समोर आणले होते.त्यामध्ये व
१०० % तथ्य आहे.पण हल्लीच्या राजकारण्यांना हे तथ्य व वास्तव मान्य नसते.
राज्यातील महायुती सरकारच्या १०० दिवसांच्या कामांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्री आदिती तटकरे यांचा महिला आणि बालविकास विभाग ८० टक्के गुणांसह सर्वोत्तम ठरला आहे.तर सार्वजनिक बांधकाम विभाग दुसऱ्या तर कृषी विभाग तिसऱ्या स्थानी आहे. या १०० दिवसाच्या रिपोर्ट कार्डवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे.पालघरचे पोलीस अधीक्षक हे सगळ्यात भ्रष्ट अधिकारी असताना,त्यांना अव्वल नंबर कसा काय दिला गेला ? त्यासाठी कोणते निकष लावण्यात आले ? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.
काल महाराष्ट्र दिन होता आणि महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने महत्वाचा दिवस होता. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांच्या विभागाचे प्रगती पुस्तक जाहीर केले. स्वतःच परीक्षा घ्यायची,स्वतःच गुण द्यायचे आणि कोणाला तरी उत्तीर्ण करायचे व कोणाला अनुत्तीर्ण करायचे ? हे काम हेडमास्तर म्हणून फडणवीस यांनी केलं आहे.गेल्या एप्रिल महिन्यात सुद्धा त्यांनी असेच गुण दिले होते,त्यामध्ये एका महिन्यात असा काय बदल झाला ? हे कळायला मार्ग नाही.पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना त्यांनी पहिला क्रमांक दिला आहे.त्यामुळे तमाम पालघरवासियांच्या भुवया वर गेल्या आहेत.जिल्ह्यात क्राईम रेटचा वेलू गगनावर पोहोचला असताना पोलीस अधीक्षकाना प्रथम क्रमांक मिळतो,हे एक न उलगडणारे कोडेच आहे.हे तेच पोलीस अधीक्षक ज्यांनी गद्दारी करताना आमदार लोकांना गुजरातला जाण्यास मदत केली.गुटखा व ड्रग्ज जे गुजरातवरून येते,त्यावर कधीच कारवाई केली नाही आणि त्यांना अव्वल क्रमांक दिला जातो,असं म्हणत दानवेंनी सरकारचे कान चांगलेच उपटले आहेत.दुसरीकडे मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे,आयुक्त मधुकर पांडेय यांना देखील अत्यन्त कार्यक्षम आयुक्त म्हणून गौरवण्यात आले आहे.वास्तविक त्यांची कामगिरीही फारशी उल्लेखनीय अशी कधीच नव्हती,पण ते सरकारच्या दृष्टीने कार्यक्षम ठरले.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी ही धडपड चालवल्याचे दिसून येत आहे.त्यांचे गृहखाते हे गेल्या तीन वर्षाच्या काळात चांगलेच बदनाम झाले आहे.आपल्या खात्याचा काळवंडलेला चेहरा उजळ करण्यासाठी फडणवीस हे सध्या आपल्या जीवाचा आटापिटा करत आहेत.त्यांच्या बनावट प्रगती पुस्तकामध्ये परिवहन विभाग ५ व्या क्रमांकावर आहे.त्यामध्ये सरकारने ५० ऐवजी ४० टक्के पगारवाढ देत एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.कृषी विभागाला टॉप ५ मध्ये स्थान देण्यात आले आहे.१ रु.पीक विमा योजना सरकारने कडीकुलपात बंद केली आहे.या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला म्हणून ती बंद करण्यात आली आहे. मराठवाड्यात २८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.गृहविभागाबद्दल सांगायची गरज नाही.बीड घटना,परभणी घटना,स्वारगेट घटना,बदलापूर घटना,सैफ अली हल्ला,केंद्रीयमंत्र्यांच्या मुलीची छेड काढल्याची घटना,अशा एक ना अनेक घटना घडल्या.गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्यात आतापर्यंत आत्महत्याच्या ३१ घटना घडल्या आहेत.महिला बालविकास विभागामध्ये लाडकी बहीण योजनेतून ८ लाख महिलांना डिच्चू देण्यात आला आहे.सरकार २१०० रु.लाडक्या बहिणीला देणार होते,आता १५००/- रु. देखील लाडक्या बहिणींना मिळणे,अशक्य झाले आहे.राज्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे,जलजीवन मिशन योजना पूर्णपणे नापास झाली आहे,असे राज्याचे वरिष्ठ मंत्रीच आता म्हणू लागले आहेत.वेदिका चव्हाण या मुलीचा मृत्यू हा पाणीटंचाईमुळे झाला.व्हिजन महाराष्ट्र कार्यक्रम राबवला जाणार होता.त्याचे काय झाले ? याविषयी शासनस्तरावरून कोणतीही माहिती दिली जात नाही. राधाकृष्ण विखे पाटील,जयकुमार गोरे जयकुमार,रावल माणिकराव कोकाटे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
पालघरचे पोलीस अधीक्षक सगळ्यात भ्रष्टाचारी अधिकारी आहेत.गुटखा व ड्रग्ज यांचा गुजरातमधून सतत ओघ सुरू असतो,पण त्यावर योग्य ती कारवाई होत नाही.ते पालघर मार्गे संपूर्ण राज्यात जातं,हे त्यांच्या आशीर्वादाने जात.कुठलीही कारवाई होत नाही.त्यांना सरकार पहिला क्रमांक देते.असा थेट आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.शेतकरी सन्मान निधी वाढवण्याचा आश्वासन दिलं होतं.अंगणवाडी आणि आशा सेविका यांचं वेतन वाढवण्यात आले नाही.छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई सरकारकडून आश्वासन देण्यात आले होते,पण तशी करण्यात आली नाही.जनतेकडून तुम्ही गुणांक घ्या,तेव्हा तुम्हाला खरे गुणांक कळतील,ते तुम्हाला खरे गुण देतील,असंही पुढे अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जे काही गंभीर आरोप केले आहेत.त्याची शहानिशा सरकारने करायला हवी,अन्यथा सरकारचे हे प्रगती पुस्तक बनावट असल्याचे मानले जाईल.

