दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आम्हाला देशाची सुरक्षितता नाही, तर निवडणुका महत्वाच्या…
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी लगबगीने दिल्लीत परतले.दिल्लीत यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन घडलेल्या घटनेचा त्यांनी आढावा घेतला.दरम्यान देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते व त्यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली.या दौऱ्यात अमित शहा यांनी मदतकार्या विषयी आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात आल्या,आल्या अनेक सिंहगर्जना केल्या. ” किसीको छोडा नही जायेगा, हरेक को अपने किये कि सजा मिलेगी,” अशा त्या गर्जना होत्या.त्या ऐकल्यानंतर आम्हा भारतीयांचा ऊर भरून आला. त्यांच्या ५६ इंची छातीला न्याय देत मोदी जम्मू – काश्मीरच्या दौऱ्यावर निघतील,अशी अपेक्षा होती.त्यांचे ९ हजार कोटी रु.किमतीचे विमान हवेत झेपावले,पण ते काश्मीरच्या दिशेने न जाता बिहारच्या दिशेने गेले.सध्या आपले पंतप्रधान बिहार राज्याच्या निवडणूक प्रचारात दंग आहेत. राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार समवेत थट्टा मस्करी करताना पाहायला मिळत असतात.यापूर्वी मणिपूर वर्षभर हिंसाचारात होरपळत असताना,आपले पंतप्रधान महाराष्ट्र,दिल्ली झारखंड राज्यातील निवडणूक प्रचारात रममाण झाले होते.
देशाचे माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री व दिवंगत इंदिरा गांधी हे दोघे पाकिस्तानसमवेत युद्ध सुरू असताना सीमेवर जाऊन लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधून युद्ध परिस्थितीचा आढावा घ्यायचे.आज आपले पंतप्रधान मोदी यांना देशाच्या सुरक्षितते ऐवजी निवडणूक प्रचार महत्वाचा वाटतो.चीन अरुणाचल प्रदेशात हजारो चौ. कि.मी.आत घुसला आहे.पण आमचे पंतप्रधान त्याविषयी अवाक्षर काढत नाहीत.
पहलगाम दुर्घटनेनंतर मोदी यांनी ” जल सिंधू करार,” रद्द केल्याचे जाहीर केले आहे.पण हे पाणी रोखल्यास त्याची साठवणूक कशी करणार ? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही. ते उत्तर देण्याची तसदी देखील ते घेणार नाहीत.दुसरीकडे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भूत्तो यांनी आमचे पाणी रोखल्यास रक्ताचे पाट वाहतील,अशी थेट धमकी दिली आहे.त्यावर देखील आमचे पंतप्रधान मूग गिळून बसले आहेत.

