दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
उपमुख्यमंत्री शिंदे यांची पहलगाम भेट ; महायुती सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर,
जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना मदत करण्यावरून महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती निवारण व पुनर्वसनमंत्री गिरीश महाजन यांना पाठवल्यानंतर लगोलग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये दाखल झाल्यामुळे खा.संजय राऊत यांनी सरकारला चांगलेच घेरले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात समांतर सरकार चालवत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.त्यामुळे सरकारवर खुलासा करण्याची पाळी आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्रीपद हुकल्यामुळे नाराज असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधून मधून आपली नाराजी वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करत असतात.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्याना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नसतात.शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात प्रस्तावित केलेल्या अनेक प्रकल्पाना फडणवीस यांनी स्थगिती देण्याचे सत्र आरंभल्यामुळे या दोघांमधील दरी सतत वाढत गेली.त्यानंतरच्या काळात अनेक महत्वाच्या बैठकीना शिंदे यांनी दांडी मारण्यास सुरुवात केली.पालकमंत्रीपदाच्या वाटपातही फडणवीस यांनी कुरघोडी केल्यामुळे शिंदे हे अधूनमधून दरे या आपल्या मूळ गावी जाऊन राहू लागले.काल त्यांनी अचानक काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी थेट पहलगाम गाठल्यामुळे सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले.राष्ट्रिय आपत्तीच्या वेळी दोन पक्ष कुरघोडीचे राजकारण करत असल्याचे पाहायला मिळाले.वास्तविक आपत्ती निवारण व पुनर्वसन हा विभाग गिरीश महाजन यांच्याकडे आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना काश्मीरला पाचारण केले असताना,शिंदे यांनी काश्मीर गाठल्यामुळे राज्यात चुकीचे संकेत गेले आहेत.या सर्व घडामोडीनंतर सेनेचे मुख्य प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी महायुती सरकारवर चांगलेच तोंडसुख घेत,शिंदे हे राज्यात समांतर सरकार चालवत असल्याचा सनसनाटी आरोप केला.त्यांच्या या आरोपानंतर शिंदे गटाच्या नेत्यांना या प्रकरणी सारवासारव करावी लागली.

