दीपक मोहिते,
ग्राउंड रिपोर्ट,
पहलगाम दहशतवादी हल्ला ; जगभरात निषेधाचा सूर,
काश्मीरच्या पहलगाम या निसर्गरम्य परिसरात दहशतवाद्यानी अंधाधुंद गोळीबार करत सुमारे २६ पर्यटकांची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यातील चार तरुण हे ” द रेसिस्टंन्ट्स फ्रंट ( टीआरएफ ) या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी आहेत.काश्मीर खोऱ्यात गेल्या चार दशकापासून पाक पुरस्कृत हा दहशतवाद असुन त्यामध्ये ५ प्रमुख कट्टरतावादी संघटना सहभागी आहेत.
१९९० च्या दशकात काश्मीरमध्ये पाकिस्तानने दहशतवाद्यांची घुसखोरी आणि कट्टरतावाद याला खतपाणी घालण्यास सुरुवात केली.सर्वप्रथम या दहशतवाद्यानी काश्मीरमधून हुसकावून लावण्याचे तंत्र अवलंबले.
त्यानंतर काश्मिरी पंडितांचं पलायन सुरू झाले.काश्मिरामधील कट्टरतावाद्यांनी पुढची अनेक वर्षं भारत सरकारविरुद्ध आणि सुरक्षा यंत्रणांविरुद्ध सशस्त्र कारवाया सुरू ठेवल्या. बॉम्बहल्ले,अपहरण, गोळीबार,हत्या हे सतत घडत राहिले.यामागे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयची फूस आहे. या दहशतवाद्याना ही संघटना, पैसा,शस्त्रे व प्रशिक्षण देत असते.
काश्मीर अशांत करणाऱ्या या ५ दहशतवादी संघटना सक्रिय आहेत.
१. लष्कर-ए-तोयबा
काश्मिरात सर्वाधिक हिंसक कारवाया करणारी लष्कर-ए-तोयबा ही कट्टरतावादी संघटना.
मुंबईत २६/११ चे हल्ले आणि संसदेवर २००१ साली झालेल्या हल्ल्यांमागे हीच संघटना होती.हाफिज सईद व झकी ऊर रहमान हे २६/११ हल्ल्याचे मास्टरमाइंड होते.
पाकिस्तानात जेव्हा २००२ साली लष्कर-ए-तोयबावर बंदी आली तेव्हा या संघटनेने जमात-उद-दवा हे नवीन नांव धारण केलं आणि लष्करशी आपला काहीही संबंध नसल्याचं जाहीर केले.पण हाफिझ सईदच पडद्यामागून या संघटनेची सूत्रं हलवतो. हे अनेक घटनावरून सिद्ध झाले.
पाकिस्तानच्या मदतीने चालणाऱ्या या हाफिज सईद याच्या संघटनेने १९९० च्या दशकात कारवाया करण्यास सुरुवात केली. काश्मीर आणि भारताच्या इतर शहरांमध्येही या संघटनेने कारवाया घडवून आणल्या.एलइटीवर भारताने यूएपीए कायद्याखाली निर्बंध लादले,अमेरिकेने २००१ मध्ये आपल्या दहशत विशेष यादीमध्ये एलइटीचा समावेश केला.तर संयुक्त राष्ट्रांनी २००५ मध्ये संघटनेवर निर्बंध लादले.
२. हिजबुल मुजाहिद्दीन,
या संघटनेमध्ये काश्मिरी तरुणांचा मोठ्या प्रमाणात भरणा असलेली हिजबुल ही काश्मिरातली पहिली दहशतवादी संघटना मानली जाते.१९८९ मध्ये या संघटनेची स्थापना झाली. पाकिस्तानी गुप्तहेर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटीलिजसिस ( आयएसआय ) शी त्यांचे संबंध होते.
हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सय्यद सलाहुद्दीन
हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सय्यद सलाहुद्दीन
२००१ हे या संघटनेच्या इतिहासातलं महत्त्वाचं वर्ष आहे.याच वर्षी हिजबुलचा काश्मीरमधील कमांडर माजिद दार याने भारतीय यंत्रणांविरुद्ध शस्त्रसंधी पुकारली आणि त्या संघटनेत उभी फूट पडली.संघटनेत अंतर्गत मतभेद विकोपाला गेल्यानंतर २००३ साली दार मारला गेला.
आजही हिजबुल काश्मीर खोऱ्यात सक्रीय आहे.
३. हरकत-उल्-मुजाहिद्दीन,
पाश्चात्य देशांनी ज्या घटनेचं वर्णन काश्मिरमधील पहिली दहशतवादी कारवाई असं केलं होतं तिच्यामागे हात होता हरकत-उल्-अन्सार या संघटनेचा.१९९५ साली हरकत उल अन्सार या संघटनेने पाच पाश्चात्य पर्यटकांचं अपहरण केलं.या घटनेनंतर अमेरिकेने या संघटनेवर बंदी घातली.
मसूद अजहर याची कंदाहर विमान अपहरणानंतर सुटका केली गेली.सुटकेनंतर याच मसूदने नवीन संघटना उभी केली.तीचे नांव आहे
जैश- ए -मोहम्मद.
या बंदीचा परिणाम असा झाला की त्यांनी आपलं नाव बदलून हरकत-उल्-मुजाहिद्दीन असं केलं.याचे सदस्य अफगाणिस्तानातल्या हक्कानी नेटवर्कच्या नेतृत्वात रशियन सैन्याशीही लढले होते. या संघटनेने भारतीय यंत्रणांविरोधात अनेक कारवाया केल्या.
त्यांच्या अनेक नेत्यांची धरपकड झाली ज्यात मसूद अझहर याचाही समावेश होता.हा तोच मसूद अजहर, ज्याची कंदाहर विमान अपहरणानंतर सुटका केली गेली.सुटकेनंतर मसूदने नवीन संघटना उभी केली – जैश-ए-मोहम्मद.
४. जैश-ए-मोहम्मद
१३ डिसें.२००१ रोजी पाच सशस्त्र कट्टरतावादी एका पांढऱ्या अँबेसेडर गाडीतून संसदेच्या आवारात शिरले. अर्धा तास चाललेला गोळीबार,ग्रेनेडचे हल्ले यामध्ये ९ लोक मारले गेले.हा हल्ला जैश-ए- मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दोन संघटनांनी घडवून आणला होता.
एअर इंडियाचं अपहरण झालेलं आयसी ८१४ विमान आणि त्यात असलेल्या सगळ्या लोकांना सुरक्षितपणे सोडवण्यासाठी भारताने ज्या लोकांची सुटका केली त्यामध्ये मसूद अझहरचा समावेश होता.याच मसुदने जैशची स्थापना केली होती.
भारताने दहशतवाद प्रतिबंध कायदा,म्हणजे पोटा कायद्याअंतर्गत जैशवर बंदी घातली आहे.अमेरिकेनेही २००१ मध्ये या संघटनेला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केलं होतं.तर पुलवामामध्ये सीआरपीएफ च्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातही याच जैशचा हात होता,असं राष्ट्रीय तपास यंत्रणेने ( एनआयए ) म्हटलं आहे.
५. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट ( जेकेएलएफ )
१९८८ साली भारताविरुद्ध सशस्त्र बंडाळ्या सुरू करणारी संघटना म्हणजे जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट ( जेकेएलएफ ) सीमेपार पाकिस्तानमध्ये असलेल्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट ( जेकेएलएफ ) आपल्या कट्टरतावाद्यांना शस्त्रास्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण देत असतात.२०१९ मध्ये यूएपीए कायद्याअंतर्गत जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट ( जेकेएलएफ ) या संघटनेवर भारताने बंदी घातली.१९८८ पासून काश्मीर खोऱ्यात मलिक याच्या नेतृत्वातील जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट ( जेकेएलएफ ) हिंसाचार पुढे नेण्यात आघाडीवर आहे.”
पाकिस्तानच्या पाठिंब्यावर सुरू झालेली ही संघटना सशस्त्र उठाव आणि काश्मीरचं स्वातंत्र्य,अशा दोन्ही मुद्द्यांवर लढत होती.गेल्या चार दशकापासून हजारो काश्मिरी तरूण सीमेपार जाऊन प्रशिक्षण घेऊन आले,असं भारतीय तपास यंत्रणाचे म्हणणे आहे.जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट ( जेकेएलएफ ) शी संबंधित लोकांनीच भारतीय अधिकारी रविंद्र म्हात्रे यांची लंडनमध्ये हत्या केली होती.त्यानंतर जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता मकबूल बट याला भारतात फाशी देण्यात आली होती.१९९० च्या दशकातील जोर आता दिसत नसला तरी या संघटना आजही सक्रिय आहेत.
पहलगाम घटनेनंतर भारत सरकार आता ऍक्शन मोडवर आले आहे.सरकारने दोन देशातील करार स्थगित केले असुन पाक अधिकारी व पाक नागरिकांनी ४८ तासात भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान अनेक देशांनी या हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

