दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
जागतिक वसुंधरा दिन ; वेळीच सावध झालो नाही तर पृथ्वीचा विनाश अटळ,
आज जागतिक वसुंधरा दिन,पण तो साजरा करण्याच्या मनस्थितीत आज एकही देश नाही.हवेतील प्रदूषण,जलप्रदूषण व पर्यावरणाच्या स्थितीत झपाट्याने घसरण होत आहे.त्यामुळे मानवजातीला सध्या त्रास सहन करावा लागत आहे.कोरोनाच्या काळात मानवाचा संचार खंडीत झाल्यामुळे वसुंधरेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ शकली.तर दुसरीकडे संपूर्ण मानवजात,आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे.वसुंधरेच्या गळ्याला नख लावण्यात येत असल्यामुळे वादळे,त्सुनामी,भूकंप, ऋतुमान बदलणे,नापिकी, अवकाळी पाऊस,अशा नैसर्गिक संकटाना तोंड द्यावे लागत आहे.
वसुंधरेच्या प्रकृतीमध्ये होत असलेल्या सुधारणेवरून असा निष्कर्ष निघतो कि आपण सारे ग्लोबल वार्मिंगला किती कारणीभूत ठरलो होतो.स्वच्छ हवा,स्वच्छ पाणी,पक्षांचा किलबिलाट,या सर्वांपासून आपण अनेक दशके वंचित होतो,ते केवळ आपल्या वागण्यामूळेच..कोरोनाच्या काळात हे सारे आपल्यासमोर हात जोडून उभे होते,पण आपण त्याचा उपभोग घेऊ शकलो नाही.आपल्यावर आलेले संकट हे मानवनिर्मित होते.तसेच गेली अनेक वर्षे वसुंधरा जी अंथरुणावर पडून होती,तीला या काळात संजीवनी मिळाली.तर दुसरीकडे मानवाला मात्र बेड्स कमी पडत होते.हा खऱ्या अर्थाने विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल.
वसुंधरा दिन म्हणजे पृथ्वी दिन होय.पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्याचा दिवस,तो जगभरात पाळण्यात येत असतो.पहिला पृथ्वी दिन २२ एप्रिल १९७० रोजी अमेरिकेतील सनफ्रान्ससिस्को येथे साजरा करण्यात आला.सध्या तो १७५ देशात साजरा केला जातो.जनजागृतीच्या माध्यमातून वृक्षारोपण, वृक्षतोड रोखणे,नद्या स्वच्छ राखणे,पर्यावरणाचे संतुलन अबाधित ठेवणे,शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करणे, रासायनिक खतांचा वापर टाळणे,इ.कामे होणे अपेक्षित असते.पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो,त्यामुळे सर्वच देशातील वसुंधरा धोक्यात आली आहे.वेळीच आपण जागे झालो नाही तर येणाऱ्या काळात पृथ्वीचा विनाश अटळ आहे.

