दीपक मोहिते,
” लाडकी बहीण योजना,” आता गटांगळ्या खाऊ लागली आहे….
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे सुरु करण्यात आलेली ” लाडकी बहीण योजना, “आता गटांगळ्या खाऊ लागली आहे.महिलाच्या मतांवर डोळा ठेवून महायुतीने ही योजना सुरु केली.त्याचा फायदा निवडणुकीत महायुतीला फायदा झाला. पण आता या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे सरकार निरनिराळॆ निकष लावून लाभार्थी महिलांची संख्या कमी करत आहेत. आतापर्यंत ९ लाख लाभार्थ्यांना सरकारने बाहेरचा रास्ता दाखवला आहे.
सरकारने आता लाडकी बहीण योजनेत मोठा निर्णय घेतला असून सुमारे ८ लाख महिलांना यापुढे १५०० ऐवजी फक्त ५०० रु. मिळणार आहेत.ही योजना सुरुवातीपासूनच महिलांसाठी आर्थिक मदतीचा आधार होती.मात्र,नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी ही रक्कम कमी करण्यात आली आहे.
महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत याबाबत सविस्तर खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की,या महिलांना दोन्ही योजनांचा पूर्ण लाभ देता येत नसल्याने शासनाच्या पूर्वीच्या निर्णयानुसारच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.त्यामुळे कुठलाही नवीन घोळ किंवा गोंधळ झालेला नाही.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रु.मिळण्याचे निकष ठरवताना शासनाने २८ जून आणि ३ जुलै २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयांनुसार,इतर कोणतीही सरकारी योजना न घेतलेल्या महिलांनाच पूर्ण १५०० रु.दिले जातात.पण ज्या महिलांना इतर योजनांचा काही लाभ मिळतो,त्यांना फक्त फरकाची रक्कम म्हणजे ५०० रु.देण्यात येत आहेत.
त्याचप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजनेचा दर महिना १ हजार रु.लाभ घेणाऱ्या सुमारे ७.७ लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून उर्वरित फक्त ५०० रु.चाच सन्मान निधी मिळणार आहे. यामध्ये एकाही पात्र महिलेला योजना बंद करण्यात आलेली नाही,असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
या योजनेबाबत विरोधकांकडून सातत्याने अपप्रचार करण्यात येतो आहे,असे म्हणत अदिती तटकरे यांनी या मुद्यावर सरकारची बाजू मांडली.त्यांनी विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले असून त्याची नोंदही घेण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या भगिनींनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही तटकरे यांनी म्हटले आहे.या योजनेंतर्गत महिलांना दर महिना स्थिर सन्मान निधी देण्याचा उद्देश कायम ठेवण्यात आला असून शासन धोरणात कोणताही गोंधळ नाही,असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.
पण यापूर्वी ज्या महिलांना दोनवेळा १५०० /- रु. दिले गेले,त्या रकमेचे काय ? हा प्रश्न अनूत्तरितच आहे.हे हप्ते देण्यापूर्वी महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या लाभार्थी महिलांना इतर योजनाचा लाभ मिळतो कि नाही,याची पडताळणी केली नाही.ही रक्कम हजारो कोटीमध्ये आहे.ही एकप्रकारे सार्वजनिक पैश्याची उधळपट्टीच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

