नवीन पाटील,
” रणसंग्राम,”
बोईसर विधानसभा बविआसाठी प्रतिष्ठेची,शिवसेनेच्या दोन्ही गटांसोबत होणार चुरशीची लढत
बोईसर विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांसोबत चुरशीची स्पर्धा होणार असून बोईसर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे.मतदारसंघ निर्मितीपासून बोईसर विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा बहुजन विकास आघाडीने विजय मिळवला आहे.बहुजन विकास आघाडीतून दोन टर्म आमदारकी भूषवलेले माजी आ.विलास तरे शिवसेनेच्या (शिंदे गट) तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर बहुजन विकास आघाडीकडून विद्यमान आ.राजेश पाटील पुन्हा रिंगणात आहेत तर डॉ. विश्वास वळवी शिवसेनेच्या ( उद्धव ठाकरे ) तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. जिजाऊ संघटनेकडून नरेश धोडी आणि मनसेचे शैलेश भूतकडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
बोईसरमध्ये बहुजन विकास आघाडी आपला बालेकिल्ला वाचवण्यासाठी लढत आहे. त्याचवेळी शिवसेनेचे दोन्ही गटही बोईसरमध्ये विजयाचे दावे करत आहेत.गेल्या १४ दिवसात जोरदार प्रचार करून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतु,तिरंगी लढतील बोईसरचा किल्ला कोण काबीज करणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघात पालघर आणि वसई तालुक्यांच्या पूर्वेकडील भागाचा समावेश आहे.प्रसिद्ध तारापूर औद्योगिक क्षेत्राचा मोठा भाग बोईसर विधानसभा मतदार संघात येतो.या औद्योगिक क्षेत्रामध्ये अकराशे पेक्षा अधिक कारखाने असून सुमारे दोन लाख कामगार रोजगार मिळवत आहेत.
मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून २००९ आणि २०१४ मध्ये बहुजन विकास आघाडीत असलेले विलास तरे सलग दोन वेळा बोईसरमधून निवडून आले होते.२०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवली होती.त्यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांनी विलास तरे यांचा निसटता पराभव केला होता.त्यामुळे बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा एकदा राजेश पाटील यांच्यावर विश्वास टाकला आहे.मनसेचे शैलेश भूतकडे आणि जिजाऊ विकास पार्टीचे नरेश धोडी रिंगणात आहेत.दोघांना मिळणारी मते निर्णायक भूमिकेत असणार आहेत.
बॉक्स कोट…
( विधानसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दे )
बोईसर विधानसभा मतदारसंघात रस्ते,पिण्याचे पाणी,डम्पिंग ग्राऊंड आणि आरोग्य सुविधांचा अभाव आहे.औद्योगिक वसाहती मधील प्रदूषण, कारखान्यांमध्ये होणारे अपघात,बोईसर शहर परिसरातील शहरीकरण झालेल्या ग्रामपंचायतीं डम्पिंग ग्राऊंडसाठी जागेची मागणी प्रलंबित आहे.बोईसर शहर आणि महामार्ग परिसरात सुसज्ज रुग्णालय उभारण्याची मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे.बोईसर आणि सफाळे ग्रामीण रुग्णालय लालफितीत अडकून आहे, महामार्गावरील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस बिकट होतं असल्याने दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

