प्रितेश पाटील,
” रणसंग्राम,”
डहाणू विधानसभा ; निकोले व मेढा या दोघांमध्ये सरळ लढत,
महाराष्ट्राचे शेवटचे टोक असणाऱ्या आदिवासी बहुल
डहाणू अनु.जमाती विधानसभा मतदारसंघात एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी,खरी लढत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या मार्क्स.कम्यु. पक्षाचे विद्यमान आमदार कॉ.विनोद निकोले आणि महायुतीचे भाजपच उमेदवार विनोद मेढा यांच्यात होत आहे.जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार कल्पेश भावर,बहुजन विकास आघाडीचे सुरेश पाडवी,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजय वाडिया,बहुजन समाज पक्षाचे संतोष ठाकरे,अपक्ष उमेदवार वसंत भसरा,आणि मिना भड रिंगणात असले तरी खरी लढत निकोले व मेढा या दोघांमध्ये होईल,असा अंदाज सर्वत्र व्यक्त होत आहे.
डहाणू अ.ज.विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख १ हजार २३९ मतदार आहेत.त्यापैकी १ लाख ४९ हजार ६२७ पुरुष,तर १ लाख ५१ हजार ५७८ स्त्री मतदार आहेत व तृतीयपंथी ३४ मतदार आहेत.
या मतदारसंघात डहाणू तालुक्यातील सायवन,मल्याण,डहाणू, गंजाड आणि बोर्डी महसूल मंडळे,आणि तलासरी तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे.यापैकी शहरी भागात भाजपचे वर्चस्व आहे,तर कैनाड,तलासरी,सायवन व अन्य भागात माकपचे वर्चस्व आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,तर भाजप हे तीन आलटून पालटून विजयी झाले.२०१४ मध्ये भाजपचे पास्कल धनारे या मतदारसंघातून निवडून आले होते.२०१९ साली झालेल्या निवडणुकीत भाजपचे पास्कल धनारे यांना ६४ हजार ४०७ तर मार्क्स.कम्यु.पक्षाचे कॉ.विनोद निकोले यांना ७२ हजार ११४ तर,मनसेचे सुनील ईभाड यांना ६ हजार ३३२ मते मिळाली.यावेळी झालेल्या अटीतटीच्या लढतीत माकपचे विनोद निकोले यांनी ४ हजार ७०७ मतांनी धनारे यांच्यावर निसटता विजय मिळवला होता.
या निवडणुकीत कॉ.विनोद निकोले आणि भाजपचे विनोद मेढा हे दोघे आपले नशीब अजमावत आहेत.गेल्या निवडणुकीत माकपला पाठिंबा देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,आणि भाजपला पाठिंबा देणाऱ्या शिवसेना पक्षात फूट पडल्यामुळे मतविभागणी होण्याची शक्यता आहे.त्याचा फटका प्रामुख्याने महाविकास आघाडीचे कॉ.विनोद निकोले यांना बसेल,असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
डहाणू येथे प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे विनोद निकोले यांच्या प्रचारासाठी,भारत जोडो यात्रेचे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव यांनी हजेरी लावली.या निवडणुकीत ब्रायन लोबो यांच्या कष्टकरी संघटनेने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.या मतदारसंघात कोण बाजी मारतो,याकडे तमाम डहाणूवासियांचे लक्ष लागले आहे.

