नवीन पाटील,सफाळे
खा.सवरा यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित…
पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळ असलेले रेल्वे फाटक क्रमांक ४२ हे पर्यायी व्यवस्था न करता ३१ मार्च २०२५ रोजी रेल्वे प्रशासनाने अचानकपणे बंद केले होते. त्यामुळे पादचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
या निर्णयाच्या निषेधार्थ १३ मे पासून सफाळे विकास कृती समितीतर्फे उपोषण सुरू करण्यात आले होते.आज खा.डॉ.हेमंत सवरा यांनी उपोषणस्थळी भेट देवून पर्यायी व्यवस्थेसंदर्भात काही आश्वासने दिल्यानंतर आंदोलकानी तात्पुरती स्थगिती दिली.मात्र दिलेल्या वेळेत मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन पूर्ववत सुरू करण्यात येईल,असा इशाराही कृती समितीकडून देण्यात आला.
सफाळे स्थानकाजवळ असलेले रेल्वे फाटक क्रमांक ४२ हे बंद होऊ नये यासाठी कृती समितीतर्फे वेळोवेळी रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र फक्त आश्वासने देण्यात आली.प्रत्यक्ष कृती काहीच झाली नव्हती.
त्यामुळे ०४ एप्रिल २०२५ रोजी फाटक बंदीच्या विरोधात कृती समितीने आंदोलन केले होते.या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी आणि डीआरएम यांनी खा.डॉ.हेमंत सवरा यांच्यासमवेत बैठक घेतली होती.परंतु या बैठकीनंतरही प्रशासनाकडून फक्त आश्वासनेच मिळाली. त्यामुळे समितीने आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला होता.सलग चार दिवस चाललेल्या या आंदोलनास नागरिकांनी वाढता प्रतिसाद दिला होता.यावेळी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव,सामाजिक कार्यकर्ते प्रवीण राऊत,कृती समितीचे अध्यक्ष सिकंदर शेख,उपाध्यक्ष नचिकेत पाटील,सचिव स्वप्निल तरे,संतोष घरत यांच्यासह पश्चिम भागातील ग्रामपंचायतींचे सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे उपोषण लवकर स्थगित व्हावे, यासाठी काल खा.डॉ. हेमंत सवरा,आ.राजेंद्र गावित,जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, उपजिल्हाधिकारी महेश सागर,डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचे जनरल मॅनेजर एम.सी.पांचाळ,प्रोजेक्ट मॅनेजर पी.के.राय, बी.पी.सिंग,जगदीश. व्ही. राठोड,मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे जोशी यांच्यासह कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची सलग पाच तास बैठक झाली. उपोषणकर्त्यांच्या मागण्यावर सकारात्मक तोडगा काढण्याच्या दृष्टीने या वेळी चर्चा झाली होती.
सफाळे विकास कृती समितीच्या आंदोलनामुळे मिळालेल्या सुविधा तसेच आश्वासने,
फाटक लगत पूर्व – पश्चिम भुयारी मार्ग पादचाऱ्यासाठी टाइमलाइन काही दिवसात जाहीर होणार आहे.
पूर्व भागातील प्रवाशांसाठी लिफ्टचे काम त्वरित चालू करून सप्टें.महिन्यात चालू करणार.
पूर्वेस जिल्हापरिषदच्या जागेचा हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागला की सरकता जिना चालू करणार.
पश्चिमेस रेल्वे फलाटावर जुलै महिन्यात सरकता जिना सुरू करणार.
पालघरच्या दिशेने होणारा पादचारी पूलाच्या जागेची
पाहणी करणार.

