वसंत भोईर,वाडा
वाडा तालुक्यातील चौदा गावपाड्याना टॅकरने पाणीपुरवठा,
तालुक्यातील चौदा गाव पाड्यात टॅकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून त्यामुळे लाखो करोडो रू.खर्च करून बांधण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजना कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.या योजनांचा पुरता फज्जा उडाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वाडा तालुक्यातील ओगदा ग्रामपंचायत हद्दीतील सागमाळ,टोकरेपाडा, जांभूळपाडा,घोडसाखरे, दिवेपाडा,फणसपाडा, गवळीपाडा,तरसेपाडा तुसे ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरीपाडा,फणसपाडा पिंपळास ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळास,मुसारणे, बालिवली ग्रामपंचायत हद्दीतील चौरेपाडा तर उमरोठे ग्रामपंचायत हद्दीतील नदीचापाडा या गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.त्यामुळे या गावांना टॅकरने पाणी पुरवठा सुरू केला असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर असून या योजनांचा कालावधी संपला तरी योजना पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत.अनेक योजनांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून ती अपूर्ण अवस्थेत आहेत.कोट्यवधी रू.खर्च करूनही नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओगदा ग्रामपंचायत हद्दीतील पाड्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर असून वनविभागाकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे.त्यामुळे या योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत.त्यामुळे योजना अपूर्ण असलेल्या गाव पाड्यात टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती वाडा पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जे.डी.जाधव यांनी दिली आहे,

