वसंत भोईर,वाडा
अंभई/आमगाव ग्रामस्थांनी घातला पंचायत समिती कार्यालयाला घेराव,
तालुक्यातील अंभई ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक आणि वाडा पंचायत समितीचे बांधकाम, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी केलेला भ्रष्टाचार पुराव्यासह सहनिर्देशनास आणूनही कारवाईस टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांनी गेल्या बुधवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सहाव्या दिवशीही या उपोषणाची दखल न घेतल्याने आज अंभई आमगाव ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयाला घेराव घालून अधिकाऱ्यांना जाब विचारला.
या ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी व अधिकारी यांनी वस्तूंची खरेदी करताना अनावश्यक अंदाजपत्रक, कामाचा सुमार दर्जा,छुप्या मार्गाने निविदा काढून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देणे,असे विविध आरोप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपोषण सुरु करताना ग्रामस्थांनी केली आहे.
तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली,परंतु जोपर्यंत कारवाईला सुरुवात होत नाही,तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार,असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला. सहाव्या दिवशीही दखल न घेतल्यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले व त्यांनी पंचायत समिती कार्यालयाला घेराव घालून निषेध जोरदार नोंदवला.

