सुशीला फातरफेकर,नालासोपारा
महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेनेचा हल्लाबोल,गटाराचे काम बंद पाडले,
गावकऱ्यांना विश्वासात न घेता सांडोर स्मशानभूमीजवळ महानगरपालिकेने गटार वळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.तसेच खोदकाम करताना दफन केलेल्या मृतदेहांची विटंबना केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. पालिकेच्या या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त करताच शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने घटनास्थळी धडक देऊन गटाराचे काम बंद पाडले.
सांडोर स्मशानभूमीत लिंगायत समाजातील समाज,पूर्वी येथे दफनविधी करत असत.या स्मशानभूमीत होळी रमेदी, भास्कर आळी पंचक्रोशी परिसरातील मयत नागरिकांचे अंत्यसंस्कार या स्मशानभूमीत करण्यात येत असतात.महापालिकेने टेंडर काढून गटाराचे काम सुरू केले आहे.हे गटार आधी कॅन्सर रुग्णांसाठी असलेल्या वसाहतीगृहाजवळून वळवण्यात येणार होते.मात्र रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागेल म्हणून वसाहतीगृहाने त्यास नकार दिल्यानंतर पालिका प्रशासनाने थेट स्मशानभूमीतूनच गटार वळवले.मात्र याबाबत गावकऱ्यांना कोणतीही कल्पना किंवा सूचना न देता पालिकेने परस्पर काम सुरू केल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
गावकऱ्यांनी या बांधकामाची माहिती शिवसेनेला दिली.त्याची गंभीर दखल घेऊन शिवसेनेने गटाचे काम बंद पाडले.यावेळी जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर,तालुकाप्रमुख प्रथमेश राऊत,शहर समन्वयक नीलेश भानुशे,जयेश राऊत व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

