वसंत भोईर,
ब्लु बेरी कंपनीच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेचे ठिय्या आंदोलन,
मौजे- वावेघर ता.वाडा जि.पालघर येथील ब्लु बेरी ऍग्रो प्रॉडक्ट प्रा.लि.ही कंपनी मानवी वस्तीपासून अवघ्या १५ फुट अंतरावर आहे. शासकीय नियमानुसार औद्योगिक कंपनी व मानवी वसाहतीमध्ये कमीत कमी ५०० मी.अंतर असणे आवश्यक आहे.मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून कंपनी सुरु असून या कंपनीमधून दुर्गंधी युक्त रसायन मिश्रित सांडपाणी सोडत असल्याने पिण्याच्या पाण्याच्या बोअर दूषित झाल्या आहेत.या दूषित पाण्यामुळे तसेच कंपनीमधून पडणाऱ्या दुर्गंधीमुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामुळे श्रमजीवी संघटनेने मौजे – वावेघर येथे बिऱ्हाड मोर्चा काढला व वाडा तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले.
जोपर्यंत वस्ती जवळ असणारी सदर कंपनी बंद करण्यात येत नाही,तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील,असे तालुका अध्यक्ष भरत जाधव यांनी सांगितले.
श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हा सरचिटणीस किशोर मढवी,जिल्हा महिला ठिणगी उपप्रमुख रेखा पऱ्हाड, तालुका सचिव सुरज दळवी, तालुका संपर्क प्रमुख रफिक चौधरी,सुजाता पारधी व इतर कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

