संदीप जाधव,बोईसर,
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आचार्य नरेंद्र महाराजांच्या अनुयायांचा मोर्चा,
जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या अपमान केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या अनुयायांनी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वामीजींचा एकेरी उल्लेख करत साधू-संतांचा अपमान केला, असा संतप्रेमींकडून आरोप करण्यात येत आहे.या आंदोलनात जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.
मोर्चात सहभागी झालेल्या शेकडो साधू-संतांच्या अनुयायांनी संताप व्यक्त करत, ” संतांचा अपमान सहन करणार नाही,” अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.संतपरंपरेचा अवमान केल्याबद्दल विजय वडेट्टीवार यांनी तातडीने जाहीर माफी मागावी,अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सदर मोर्चा चार रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर,असा काढण्यात आला होता.अनुयायांच्या वाढत्या गर्दीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.प्रशासनाने सतर्कता बाळगत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
या प्रकरणावर संतप्रेमी आक्रमक होत असताना, विजय वडेट्टीवार यांच्या विधानावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.मात्र,या आंदोलनानंतर या प्रकरणी राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
या घटनेनंतर राज्यभरात संतप्रेमी आणि भाविकांच्या प्रतिक्रिया उमटत असून,या प्रकरणावर वडेट्टीवार काय स्पष्टीकरण देतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

