संजय लांडगे,वाडा
बोअर ब्लास्टींग विरोधात डोंगस्ते ग्रामस्थ आक्रमक; आंदोलनाचा इशारा
वाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत डोंगस्ते हद्दीमध्ये सी.स्क्वेअर कं.लि. ( कॅप्टन इन्फ्रा लि. ) व गुरुकृपा इंटरप्रायझेस या नावे दगडखाण, क्रशर व्यवसाय सुरु असून सदर व्यवसायिकांकडून सातत्याने दिवसरात्र बोअर ब्लास्टींग करण्यात येत आहे.त्यामुळे गावातील शेकडो घरांच्या भिंतींना तडे जाऊन नुकसान झाले आहे. तसेच जिवीतहानी सुध्दा होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
येथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी तहसिल कार्यालय वाडा व इतर कार्यालयात तक्रारी अर्ज केले होते.परंतु गावकऱ्यांची कोणतीही तक्रार शासकीय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतली नाही व पंचनामेही केले नाहीत.त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहॆ.
शासनाकडून कारवाई होत नसल्या कारणाने सर्व ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर
१० जाने.रोजी धडक मोर्चाचे आयोजन केले असल्याचे धर्मवीर विचार मंचचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी सांगितले आहे.
तात्काळ पंचनामे करुन सदर घरांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात यावी व ब्लास्टींग विषयी चौकशी करुन बोअर ब्लास्टींग कायम स्वरुपी बंद करण्यात यावे. पिढ्यांपिढ्या जंगलात जाणाऱ्या व राहणाऱ्या आदिवासींची वारंवार खदान मालकांकडून पायवाट अडवली जात आहे ती मोकळी करावी लेखी स्वरुपात लिहून कायमस्वरुपी पायवाट सुरु करण्यात यावी.तसेच प्रकरणाची शहानिशा करुन संबंधितावर करावी,आदी मागण्यांचे निवेदन ग्रामस्थानी तहसीलदार व पोलीस यांना दिले आहे.

