दीपक मोहिते,
२६ डिसें.पासून ३५ वा वसई तालुका कला क्रीडा महोत्सव २०२४ ला सुरुवात,
वसई तालुक्यातील विद्यार्थी व नागरिक यांच्या कला व क्रीडागुणांना वाव मिळावा व त्यांना कला व क्रीडा क्षेत्रात एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहन व स्पर्धात्मक संधी देण्याच्या हेतूने वसईत दरवर्षी होणारा, वसई तालुका कला क्रीडा महोत्सव गुरु.२६ डिसें.२०२४ ते मंगळ.३१ डिसें.२०२४ या कालावधीत संपन्न होत आहे. यंदाचे कला क्रीडा महोत्सवाचे हे ३५ वे वर्ष आहे.सन १९९० मध्ये लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाप्रमाणे ३५०० स्पर्धकांच्या सहभागाने सुरू झालेल्या महोत्सवात या वर्षी कला व क्रीडा विभागात एकूण ५५ हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.दरवर्षी मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे हा महोत्सव वर्षागणिक एक निराळी उंची गाठत आहे. रौप्यमहोत्सवी कला क्रिडा महोत्सव साजरा करीत असताना माही वसई या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करुन वसईचा भुतकाळ वर्तमान पिढीला दाखवला,३० व्या वर्षी कोकण पर्व कोकण सर्व या कार्यक्रमाद्वारे सिंधुदुर्ग ते पालघर या सहा जिल्ह्यांच्या कोकण प्रांतातील संस्कृती, परंपरा,जीवनपद्धतीचे दर्शन घडविले.यावर्षी ३५ वे वर्ष असल्याने “आपल्या भारताची वैभवशाली गाथा,”अर्थात ” ग्लोरी ऑफ इंडिया,” या द्वारे भारताच्या सांस्कृतिक वैभवाची,प्रगतीची आणि लष्करी सामर्थ्याची झलक दाखवणारी आपल्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना दृढ करणारी भव्य कलाकृती साकारण्यात येणार आहे.
महोत्सवाच्या पूर्वसंध्येला, ख्रिसमस सणाचे औचित्य साधून,समाजात सुदृढ आरोग्य आणि तंदुरुस्तीचा संदेश देणारी ” ख्रिसमस फिटनेस रन,”नानभाट चर्च, विरार ते नरवीर चिमाजी अप्पा मैदान, वसई या मार्गावर २५ डिसे.२०२४ रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली असून , या वेळी काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास केलेले ज्यूड डिसोझा,सचिन कवळी, प्रणय राऊत,तसेच लडाख खारदुंगला पास येथे प्रतिकूल हवामान परिस्थितीत ७२ किमी अल्ट्रा मॅरेथॉन रन पुर्ण करणारे स्वप्निल पाटील आणि जैसलमेर ते लोंगेवाला १८० किमीची बॉर्डर रेस २२ तासात पुर्ण करणारे प्रशांत चव्हाण,हे उपस्थित राहणार आहेत.
गुरु.२६ डिसें. २०२४ रोजी माजी आ. क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते दुपारी २.३० वाजता विरार पूर्वेकडील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन होऊन सदरची क्रीडा ज्योत विरार, नालासोपारामार्गे वसईच्या नरवीर चिमाजी आप्पा क्रिकेट मैदानात पोहोचेल.या ठिकाणी ३५ व्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सायं. ४.३० वाजता राजकीय नेते,प्रसिद्ध कलाकार,ज्येष्ठ क्रीडापटू व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सुरू होईल.
उद्घाटन सोहळ्यात प्रमुख उद्घाटक म्हणून भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपट्टू आणि सलामी फलंदाज संजय बांगर,मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते व दिगदर्शक केदार शिंदे उपस्थित राहणार आहेत.या मान्यवरांसह प्रमुख पाहुणे म्हणून खा.हेमंत सावरा,वसईच्या आ.स्नेहा दुबे,नालासोपाऱ्याचे आ.राजन नाईक आणि बोईसरचे आ.विलास तरे यांच्या सह माजी आ.क्षितिज ठाकूर,माजी आ.राजेश पाटील वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, माजी खा.बळीराम जाधव,माजी महापौर राजीव पाटील,प्रविणा ठाकूर,नारायण मानकर,रुपेश जाधव,प्रविण शेट्टी हे उपस्थित राहणार आहेत.या महोत्सवाचे प्रणेते लोकनेते माजी आ.हितेंद्र ठाकूर हे या सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.
नव्या स्पर्धांचा समावेश-
यावर्षी महोत्सवात क्रीडा विभागात स्क्वॅश आणि महिलांसाठी लाठीकाठी, दहिहंडी, ज्युदो कराटे या चार नविन स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे.गेल्या महोत्सवात नव्याने सुरू केलेल्या बेस्ट फिजिक मेन्स आणि डान्स वसई डान्स,या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.जलतरण ( पोहणे ) स्पर्धा तामतलाव येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात होणार असून सदर स्पर्धेत यावर्षी ८ वर्षांखालील आणि ६० वर्षांवरील असे दोन नवीन गट वाढविण्यात आले आहेत. बास्केटबॉल ही स्पर्धा मधुबन कॉम्प्लेक्स,गोखिवरे येथील मैदानावर होणार आहे.रिंग फुटबॅाल ही स्पर्धा न्यु इंग्लिश स्कूल येथील टर्फवर होणार आहेत.
कला व क्रीडा विभागात एकूण ७२ स्पर्धा-
कला विभागात एकूण ३४ प्रकारच्या तर क्रीडा विभागात एकूण ३८ प्रकारच्या स्पर्धा विविध वयोगटात होणार आहेत.क्रीडा विभागात कबड्डी, बॅडमिंटन,शरीर सौष्ठव, खो-खो,व्हॉलीबॉल, शुटींग बॉल,कराटे,टेबल टेनिस या स्पर्धा अत्यंत चुरशीच्या होत असतात. मास्टर दत्ताराम रंगमंचावर रंगणाऱ्या शरीरसौष्ठव स्पर्धेत यंदाचा ” वसई श्री, ” या चषकाचा मानकरी कोण असेल? हे नेहमीच औत्सुक्याचे ठरते. बेस्ट फीजिक- मेन्स ही स्पर्धा यावर्षी सायंकाळी सहा वाजता सुरु होणार आहे. अशीच उत्सुकता सौंदर्य स्पर्धेतील ” मिस्टर पर्सनॅलिटी, ” व ‘मिस पर्सनॅलिटी’ या विजेतेपदासाठी पाहायला मिळते.न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संपन्न होणाऱ्या कला विभागातील एकांकिका, लोकनृत्य, रांगोळी इ.स्पर्धांना प्रेक्षकांची मोठी गर्दी असते.
यावर्षी सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.कबड्डी २५६ संघ, खो-खो ८६ संघ, लंगडी-८० संघ, लगोरी – ५० संघ, व्हॉलीबॉल ५१ संघ, शूटींगबॉल ८ संघ,थ्रो बॉल ६ संघ,रिंग फुटबॉल – ६० संघ तर बास्केटबॉल स्पर्धेमध्ये ५६ संघ सहभागी होत आहेत. पारितोषिक विजेत्या कला व क्रीडापटूंना एकूण ६ हजार ५५० हुन अधिक प्रमाणपत्रे, ९७० सुवर्ण,९७० रौप्य,९७० कांस्यपदके महोत्सवाच्या कालावधीत मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात.काही सांघिक स्पर्धांसाठी रोख बक्षिसांची तरतूद असते. कलाविभाग व क्रीडा विभागातील सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या शाळा व संस्थांना स्वतंत्र चषक तर दोन्ही प्रकारात जास्त गुणांची कमाई करणाऱ्या शाळेस वा संस्थेस सर्वसाधारण विजेतेपदाचा भव्य चषक (चॅम्पियनशीप ट्रॉफी) प्रदान करण्यात येणार आहे.
मा. दत्ताराम रंगमंच व इतर ठिकाणी होणारे महोत्सवातील लक्षवेधी कार्यक्रम-
गुरु.२६ डिसें.२०२४ रोजी उद्घाटन समारंभ संपन्न झाल्यानंतर ” डान्स वसई डान्स,” ही बॉलीवूड गीतांवरील नृत्यांची स्पर्धा होणार आहे.
शुक्र.२७ डिसें. २०२४ रोजी सायंकाळी वेशभुषा स्पर्धा मुख्य रंगमंचावर आयोजित केली जाणार आहे.
शनि.२८ डिसें. २०२४ रोजी सायं. ७.०० वाजता मिस्टर आणि मिस पर्सनॅलिटी स्पर्धा व ग्रुप फॅशन शो ( पारंपरिक वेशभूषा ) यासारख्या आकर्षक स्पर्धा संपन्न होतील.
रवि.२९ डिसें.२०२४ रोजी सायं. ५.०० नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर दहीहंडी खेळाची स्पर्धा होणार आहे तसेच ७.०० वाजता उदय साटम यांच्या स्वरधारा निर्मित “ मराठी पाऊल पडते पुढे,“ हा नामवंत कलाकारांचा सहभाग असलेला मनोरंजनाचा कार्यक्रम सादर होणार आहे.
सोम.३० डिसें. २०२४ रोजी सायं. ६.०० वाजता ” वसई श्री,” व ” बेस्ट फिजिक मेन्स,” या मानाच्या शरीरसौष्ठव स्पर्धा प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न होतील.महोत्सव कालावधीत अनेक सिनेकलावंत भेट देणार असून चित्रपटांचे प्रमोशन होणार आहे.
मंगळ.३१ डिसें.२०२४ रोजी रात्रौ ९.०० वाजता मराठी-हिंदी सुमधुर गीतांच्या ऑर्केस्ट्राने महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांची सांगता होईल.
मंगळ.३१ डिसें.२०२४ रोजी सायं. ६.०० वाजता महोत्सवाचा सांगता समारंभ होणार असून या समारंभात स्थानिक मान्यवरांसह वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळाचे पदाधिकारी,अध्यक्ष वसईभूषण भाऊसाहेब मोहोळ,कार्याध्यक्ष हेमंत म्हात्रे, प्रा.द.वि.मणेरीकर, मनोहर पाटील,रेमंड डिसिल्वा,जितेंद्र शहा,प्रकाश वनमाळी,संतोष वळवईकर, केवल वर्तक,विजय चौधरी, अनिल पी.वाझ,ज्यूड डिसोजा, लक्ष्मीकांत पाटील, सुबोध चौधरी,माणिक दोतोंडे,पंकज वर्तक इ. मान्यवर या समारंभात सहभागी होणार आहेत.३५ व्या महोत्सवात क्रीडा विभागातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूस स्व.डी.आर. राऊत (आप्पा ) स्मृती चषक’ तर सर्वोत्कृष्ट कलावंतास ‘स्व. सतीश ( नाना ) वर्तक स्मृती चषक’ प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय वर्षभरात ज्या कला-क्रीडापट्टू,साहित्यिक, पत्रकार व इतर ज्यांनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे,अशा वसई तालुक्यातील गुणवंतांचा विशेष सत्कार या महोत्सवाच्या कालावधीत करण्यात येणार आहे.
कला विभागाच्या स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कै.सुरेश वायंगणकर कलानगरी येथे, क्रीडा विभागाच्या स्पर्धा नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर माजी आ.कै. डॅामनिक घोन्सालविस क्रिडानगरी येथे,कराटे व मार्शल आर्ट्च्या स्पर्धा,समाज मंदिर येथे कै सुनिल वर्तक क्रिडानगरीत व इनडोअर स्पर्धा क्रीडा मंडळ सभागृहात कै.हरिहर बाबरेकर क्रिडानगरीत होणार आहेत.
कै.मनोज पाटील खाद्य मेळाव्यात,यावेळी वसईतील महिला बचत गटांना स्टॅाल उपलब्ध करुन दिले असुन वसईतील शाकाहारी व मांसाहारी खाद्य संस्कृतीची मेजवानी उपस्थितांसाठी करण्यात आली आहे.

