दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
क्रीडासंकुल व नाट्यगृह ; अद्याप १५ ते २० % कामे अपूर्णांवस्थेत…
वसई – विरार शहर महानगरपालिकेचे विरारस्थित क्रीडा संकुल व नालासोपारा पूर्व भागातील नाट्यगृह,या दोन्ही विकासकामाचे काम अपूर्ण असताना नुकतेच संघर्षपूर्ण वातावरणात उदघाट्न करण्यात आले. या दोन्ही विकासकामाचे श्रेय उपटण्यासाठी सत्ताधारी बहुजन विकास आघाडी व भाजप या दोन्ही पक्षाच्या लोकांनी जो हावरटपणा दाखवला, त्यामुळे या सुशिक्षित नगरीतील नागरिकांची मान शरमेने खाली गेली.
या दोन्ही विकासाकामाचे ३ ऑक्टो. रोजी उदघाट्न झाले असले तरी अद्याप १५ ते २० % कामे अपूर्णांवस्थेत आहेत. हे दोन्ही प्रकल्प तब्बल १४ वर्षे रखडली होती, या काळात एकाही राजकीय पक्षाने या प्रकरणाला वाचा फोडली नाही. मात्र हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार असल्याचे कळल्यानंतर त्यांच्यामध्ये श्रेयाची जीवघेणी लढाई सुरु झाली. वास्तविक महानगरपालिकेने यामध्ये हस्तक्षेप करून हा सोहळा रोखायला हवा होता. पण महानगरपालिकेचे आयुक्त ” हाताची घडी व तोंडावर बोट, ” अशा स्थितीत पाहायला मिळाले. हा आपला म्हणजे शासकीय कार्यक्रम नाही, म्हणून ते या लोकार्पण सोहळ्याकडे फिरकले देखील नाहीत. ज्या दिवशी या सोहळ्याचे लोकार्पण ठेवण्यात आले. त्याच दिवशी वसईचे माजी आमदार व बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते हितेंद्र ठाकूर यांचा ६१ वा वाढदिवस होता. या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या काही उत्साही मंडळीनी हा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता.पण हा कार्यक्रम अधिकृत नसल्यामुळे शासकीय निमंत्रणपत्रिका छापण्यात आली नाही. त्यामुळे या सोहळ्यास पालकमंत्री गणेश नाईक, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस आयुक्त व अन्य शासकीय अधिकारी या सोहळ्यापासून दूर राहीले. पालघरचे खा. डॉ. हेमंत सावरा हजर होते, पण केवळ आंदोलक या नात्याने. या क्रीडा संकुलाचे काम अपूर्ण असताना सत्ताधारी पक्षाने येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे सध्या आयोजन केले आहे. अनेक तांत्रिक कामे व लिफ्ट इ. कामे शिल्लक असताना अशाप्रकारची घाई करण्याचे कारण नव्हते. मैदान व बाह्य सुविधाची ( मैदानात मातीभराव, रनिंग ट्रक, क्रीडा साहित्य बसवणे,) कामे शिल्लक आहेत. त्यासाठी किमान तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. सुरुवातीला या क्रीडासंकुलाचा मूळ खर्च ४३ कोटी इतका होता, १४ वर्षानंतर तो ६८ कोटी इतका झाला. याविषयी या दोन्ही पक्षाच्या एकाही नेत्याने प्रशासनाला साधा प्रश्न विचारला नाही, मात्र श्रेय लाटण्यासाठी हे दोघे एकमेकांच्या उरावर कसे बसले, त्याचे विदारक चित्र मात्र वसईकराना बघायला मिळाले.

