दीपक मोहिते,
१३ वी राष्ट्रीय वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा १३ डिसें.२०२६ रोजी होणार,
वसई-विरार शहर महानगरपालिका आणि वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारी १३ वी राष्ट्रीय स्तरावरील वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा रवि. १३ डिसें.२०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी १५ ऑक्टो. २०२६ पासून सुरु होणार असल्याची घोषणा महापौर अजीव पाटील यांनी आज केली.
या मॅरेथॉन स्पर्धेविषयी प्रास्ताविक सादर करत स्पर्धेविषयी थोडक्यात माहिती दिली. दरवर्षी वसई-विरार शहर महापालिकेतर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत देशातील नामवंत आणि आघाडीचे धावपटू सहभागी होत असतात. अनुभवी खेळाडूंपासून ते धावण्याची आवड असलेल्या नवोदित स्पर्धकांपर्यंत सर्वांना प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा असते. यावेळीही वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेतील पूर्ण मॅरेथॉन ४२ कि.मी. ही प्रमुख स्पर्धा आहे. याशिवाय अर्ध मॅरेथॉन २१ कि.मी.१० कि.मी. धावणे आणि ५ कि.मी. धावणे, या वेळेची नोंद करणाऱ्या स्पर्धांचाही समावेश आहे. यानंतर तीन कि.मी. अंतराची ‘धमाल धाव,’ ही सर्वसामान्य नागरिकांसाठी सामुदायिक धाव आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये एकूण ५८ लाख रु.ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.देशातील सर्वाधिक पारितोषिक रक्कम असलेल्या स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा असून, ही पारितोषिके केवळ भारतीय खेळाडूंसाठी खुली आहेत. यामध्ये व्यावसायिक तसेच हौशी धावपटूंना सहभागी होता येणार असून, देशातील आघाडीचे लांब पल्ल्याचे धावपटू या स्पर्धेत सहभागी होत असतात.
वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेची नोंदणी फी देशातील इतर अनेक मॅरेथॉन स्पर्धांच्या तुलनेत कमी असून, परगावाहून सहभागी होणाऱ्या धावपटूंना विनामूल्य निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मोजक्या स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा आहे. सदर स्पर्धेमध्ये स्थानिक, एमएमआरडीए क्षेत्र, महाराष्ट्र राज्य तसेच परराज्यांतील धावपटूंचा मोठ्या संख्येने सहभाग असतो. विशेषतः सैन्यदल, रेल्वे व एनआयए विभागातील धावपटूंही लक्षणीय सहभागी होत असतात . या स्पर्धेला अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेची मान्यता प्राप्त आहे. तसेच, स्पर्धेच्या धावण्याच्या मार्गाचे मोजमाप करून असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन्स अँड डिस्टन्स रेसेस या संस्थेकडून त्यास मान्यता देण्यात आली आहे.
याशिवाय, १० ते १८ वर्षे वयोगटातील कनिष्ठ खेळाडूंसाठी (शालेय गटातील) विविध धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी विनामुल्य प्रवेश असणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग खेळाडूंसाठी ही विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महापौर अजीव पाटील यांनी या मॅरेथॉन स्पर्धेचे नियोजन प्रभावीपणे करता यावे, धावपटूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देता याव्यात तसेच स्पर्धेदरम्यान वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षितता आणि इतर अनुषंगिक बाबींचा पाठपुरावा वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आयोजकांना व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे या १३ व्या राष्ट्रीय स्तरावरील वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त धावपटूंनी उत्स्फूर्तपणे आपला सहभागी होवून ही स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन महापौर यांनी केले.
१३ व्या राष्ट्रीय स्तरावरील वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी www.vvmm.in या अधिकृत संकेतस्थळावर करता येईल. तसेच इतर माहितीसाठी संपर्क क्रमांकः 8879559049/8291262892 यांवर संपर्क साधून माहिती घेता येईल.

